Pune Corona News : कोरोनाविरुद्धच्या लढाईत अंगणवाडीताईचा मृत्यू, मुलगीही गंभीर

एमपीसीन्यूज : कोरोनाबाधित झाल्यानंतर प्राधान्याने बेड उपलबद्ध न झाल्याने कोरोना योद्धा असलेल्या एका अंगणवाडीताईंचा मृत्यू झाला. तर त्यांच्या मोठ्या मुलीची मृत्यूशी झुंज सुरु आहे. त्यामुळे फ्रंट लाईन वर्कर असलेल्या अंगणवाडीताईंना प्राधान्याने सरसकट कोरोना लसीकरण करण्यासह त्यांना सुरक्षा साधने पुरविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पोलिस, आरोग्य कर्मचारी, मनपा कर्मचारी-अधिकारी कर्मचार्‍यांप्रमाणे करोना विरुद्धच्या लढाईत तुम्हीही बिनीच्या कर्मचारी/ फ्रंटलाईन वर्कर आहात. त्यामुळे टाळेबंदी असो की करोना बाधित क्षेत्र तुमचे नियमित काम तुम्ही केलेच पाहिजे. त्याचा अहवाल दिलाच पाहिजे; अन्यथा मानधन तर दूरच तुमचे काम जावू शकते, असे आदेश वरिष्ठांनी दिल्याने अंगणवाडीताई टाळेबंदीतही रोज सर्व्हेत जात आहेत. टेक होम रेशन THR वाटत आहेत, सर्व्हे करत आहेत, गृह भेटी देत आहेत. हे करताना त्यांना मास्क,ग्लोज,सानिटायजर,फेस शिल्ड आवश्यक तेथे पीपीई किट प्रशासन पुरवत नाही.

स्वाभाविकच त्या कोरोना बाधित होत आहेत. कोरोना झाल्यानंतर फ्रंटलाईन वर्कर म्हणून त्यांना उपचाराची कसलीही व्यवस्था नाहीच. शिवाय प्राधान्याने बेडही उपलब्ध केले जात नाहीत.उपचाराच्या खर्चाची कसलीही व्यवस्था नसल्याने तेही उधार उसनवार,कर्ज काढून त्यांनाच करावे लागते.

नाही म्हणायला काम करताना मृत्यू आल्यास विम्याची सोय केली होती. तिची मुदतही मार्च 2021 अखेर संपली आहे. या सर्व दृष्टचक्रातून गेल्याने सविता शिळीमकर या एकल अंगणवाडीताई या कोरोना बाधित झाल्या. त्यांना बेड न मिळाल्याने भावाने आपल्या तालुक्यात इस्पितळात दाखल केले. तेथे त्यांचा 14 एप्रिल रोजी मृत्यू झाला. ही करुण कथा इथेच न थांबत नाही. तर सविता यांनी आजवर परिस्थितीशी एकट्या झुंजत उच्चशिक्षित केलेली त्यांची दोन्ही मुले कोरोनाबाधित झाली आहेत. त्यातील थोरल्या मुलीची मृत्युशी झुंज चालू आहे.

सविता यांची कहाणी खूपच हृदयद्रावक आहे. त्यांचे पती 20 वर्षांपूर्वीच अपघातात मरण पावल्यानंतर त्यांनी पडेल ते कष्ट करत दोन्ही मुलांना वाढवले,उच्च शिक्षित केले. त्या व त्यांच्या प्रकल्पातील अंगणवाडीताईंना कोरोना प्रतिबंधक लस घ्यायची होती.

पण फ्रंटलाईन वर्कर म्हणून पोलिस, आरोग्य कर्मचारी यांच्या प्रमाणे अंगणवाडीताईंना सरसकट( वयाची सध्या 45+अट न घालता)व प्राधान्याने लस मिळत नाही. काही प्रकल्पांचा अपवाद वगळता लसीकरण अपूर्ण तर आहेच पण त्यासाठी इतर नागरिकांप्रमाणेच 45+वयाची अट घातली जातेय. शिळीमकर यांनाही त्यामुळेच लस मिळू शकली न्हवती.

या अव्यवस्थेमुळे सविता यांचे प्राणच गेले. पण या अनुभावातून जाव्या लागणार्‍या त्या एकट्या नाहीत. कोथरूड प्रकल्पातील एक अंगणवाडी सेविका व त्यांचे पती यांना अश्याच अनुभवला सामोरे जावे लागले. ते दोघेही आता बरे होत आहेत.

तर मध्यवर्ती प्रकल्पातील एक सेविका पुण्यात बेड मिळत नाही म्हणून चिंचवड येथे उपचारासाठी दाखल व अत्यवस्थ आहेत.हा केवळ अंगणवाडीताईंपुरता प्रश्न रहात नाही तर त्या बाधित झाल्या तर त्यांचे कुटुंबियही बाधित होतात व त्यांनाही संकटाला सामोरे जावे लागते.

याविषयी अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष नितिन पवार यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, कोरोनाविरुद्धच्या योद्ध्यांनाच प्रशासन सुळावर चढवत आहे. इतर फ्रंटलाईन वर्कर प्रमाणेच अंगणवाडीताईंना सरसकट लसीकरण, सुरक्षा साधने, आजारी पडल्यास उपचाराची व्यवस्था व विम्याचे नूतनीकरण करून मिळावे.यासाठी येत्या आठवड्यात शासन व जिल्हाधिकार्‍यांकडे दाद मागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.