Pune Corona News : प्लाझ्मासाठी महापालिकेने स्वतंत्र सेल निर्माण करावा  : राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस

एमपीसीन्यूज : प्लाझ्मासाठी महापालिकेने स्वतंत्र सेल निर्माण करावा आणि उपलब्ध प्लाझ्माची डॅशबोर्डवर रोज द्यावी. त्यामुळे प्लाझ्मासाठी नागरिकांची होत असलेली वणवण थांबेल, अशी मागणी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसने गुरुवारी केली. 

महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मनाली भिलारे, प्रदेश सरचिटणीस स्नेहल शिनगारे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक गितांजली सारगे, संघटक सोनाली गाडे, शिवानी माळवदकर, वीणा कात्रे, ऋतुजा शिर्के आदींच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना या बाबत निवेदन दिले. त्यावेळी आयुक्तांनी प्लाझ्मासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचे आश्वासन दिले.

या बाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचे शहरातील प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना प्लाझ्माची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून प्लाझ्माची मागणी प्रचंड आणि प्लाझ्माचा पुरवठा कमी, असे चित्र शहरात निर्माण झाले आहे. त्यामुळे प्लाझ्मा शोधण्यासाठी नागरिकांची भटकंती वाढली आहे. प्लाझ्मा वेळेत मिळाला तर, शहरातील अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात, हे या पूर्वीही वारंवार निदर्शनास आले आहे.

कोरोनातून बरे झालेले (डिस्चार्ज) शहरात 3 लाख 17 हजारांहून अधिक रुग्ण आहेत. त्यांची माहिती मोबाईल क्रमाकांद्वारे महानगरपालिकेकडे उपलब्ध आहे. त्या माहितीचा वापर करून महापालिका कोरोनातून डिश्चार्ज झालेल्या नागरिकांना प्लाझ्मा डोनेशनसाठी आवाहन करू शकते. तसेच जमा झालेल्या प्ला्झ्माचे तपशील महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर प्रसिद्धही करता येतील. त्यामुळे गरजू रुग्णांना नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकेल. या साठी महापालिकेने स्वतंत्र सेल निर्माण करण्याची गरज आहे.

 

सद्यस्थितीत त्याला फारसा खर्चही येणार नाही. असलेल्या माहितीचा पुरेसा वापर करून प्लाझ्मा संकलीत करता येईल. त्यामुळे हजारो गरजू रुग्णांना दिलासा मिळू शकेल. तसेच कोरोनातून डिश्चार्ज झालेल्या रुग्णांची माहिती शहरातील 21 ब्लड बॅंकांपैकी काही बॅंकांना पुरविली तर, त्यांच्या मार्फतही प्लाझ्माचे संकलन करता येईल. त्यासाठी ब्लड बॅंकांच्या प्रतिनिधींबरोबर महापालिकेने बैठक घेतली तर, या बाबतची कार्यपद्धती निश्चित करता येईल.

तसेच प्लाझ्मा संकलित करण्यासाठी शहरात स्वतंत्र यंत्रणा निर्माण होईल. त्याची महापालिकेला व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करता येईल. त्यातून गरजू रुग्णांचीही प्लाझ्मासाठी धावाधाव होणार नाही. महापालिका ब्लॅड बॅकांबरोबर संवाद साधून प्लाझ्माचे दरही निश्चित करू शकते.

प्लाझ्मा दानाबाबत महापालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण करणे येणे शक्य आहे. फ्लेक्स, वेबसाईट, डॅश बोर्ड, सोशल मीडिया, प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून महापालिकेला जागरूकता मोहीम राबविता येणे शक्य आहे. तसेच या कामात महापालिकेने सुरवात केल्यावर शहरातील अनेक स्वयंसेवी संस्थाही महापालिकेला मदत करण्यासाठी पुढे येतील. त्यातून प्लाझ्मादानासाठी एक लोकचळवळ निर्माण होऊ शकते. त्यामुळे या विधायक आणि समाजोपयोगी कार्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे.

महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या माहितीचा थोडा वापर करता आला तर त्याचा फायदा पुण्यातील हजारो नागरिकांना होऊ शकतो. त्यामुळे प्लाझ्मा संकलनासाठी आणि जागरूकतेसाठी स्वतंत्र सेल महापालिकेत निर्माण करावा तसेच कोरोना डिश्चार्ज झालेल्या रुग्णांची माहिती ब्लड बॅंकांना उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या माध्यमातूनही प्लाझ्मा संकलन होऊ शकते. त्यामुळे या मुद्द्यांकडे तातडीने लक्ष देऊन महापालिका स्तरावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि कोरोना रुग्णांना दिलासा द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.