Pune Crime News : आकर्षक परतावा आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्यांना अटक

एमपीसी न्यूज – आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून आणि भिशीच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास भाग पाडून सर्वसामान्य नागरिकांची तब्बल तीन कोटी 59 लाख 96 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या बापलेकांना पुणे पोलिसांनी भूज येथील पाकिस्तान सीमारेषेवरून अटक केली.

भरतकुमार चरणदास जोशी, दिपक भरत कुमार जोशी आणि हितेन भरत कुमार जोशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 2013 ते 2019 या कालावधीत एल सी जोशी अँड कंपनी, हिरेन ट्रेडिंग कंपनी, श्री ओमकार ट्रेडर्स, दीपक टी सप्लायर्स या कंपनीत सात वर्षासाठी गुंतवणूक केल्यास आकर्षक रक्कम परताव्याचे आमिष दाखवून फिर्यादी सह इतर अकरा जणांकडून पैसे घेतले होते. त्यानंतर त्यांना कुठलाही परतावा न देता त्यांची फसवणूक केली होती. काही लोकांकडून लिलावाच्या भिशीच्या नावाने पैसे घेऊन त्यांची देखील फसवणूक केली होती. त्यांनी एकूण 3 कोटी 59 लाख 96 हजार रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी ज्ञानेश्वर नारायण काळभोर यांनी तक्रार दिल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होते.

त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक गुजरात येथे दोन वेळा तर मुंबई येथे एक वेळा जाऊन आले. परंतु आरोपींना आधी चाहूल लागल्यामुळे पोलिसांना चकवा देऊन ते पळून गेले होते. दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक बाबींचा अभ्यास करून गुजरात येथे जाऊन नऊ महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपींना गुजरातच्या कच्छ येथील पाकिस्तान सीमारेषेजवळून ताब्यात घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.