Pune Crime News : रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार, भवानी पेठेतून रुग्णालयातील कर्मचारी अटकेत

एमपीसी न्यूज – रुग्णाचे शिल्लक राहिलेले रेमडिसिव्हीर इंजेक्शन विकण्याच्या तयारीत असणाऱ्या रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत.

शिवाजी हनुमंत सावंत (वय 24, रा. खरातवाडी, पंढरपूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखेच्या पोलिसांना एक व्यक्ती जास्त किंमतीत रेमडेसिव्हर इंजेक्शन विक्री करण्यासाठी भवानी पेठेत येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून एकाला ताब्यात घेतले.

त्याच्या ताब्यातून दोन इंजेक्शन आणि रोख रक्कम असा 26 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी शिवाजी सावंत हा खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदे नर्सिंग होम येथे असिस्टंट म्हणून काम करत होता. दवाखान्यात उपचार घेणाऱ्या एका महिलेसाठी डॉक्टरांनी 6 इंजेक्शनची चिठ्ठी दिली होती. परंतु त्याने 6 ऐवजी 8 इंजेक्शन मागितले. त्यातले दोन इंजेक्शन ठेवून घेत त्याची 7 हजार रुपयांना विक्री करणार होता, असे तपासात उघडकीस आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.