एमपीसीन्यूज : गावात दवाखाना चालवण्यासाठी डॉक्टरकडे दरमहा 25 हजाराचा हप्ता देण्याची मागणी करणाऱ्या माजी सरपंचाविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामभाऊ सासवडे असे गुन्हा दाखल झालेल्या माजी सरपंचाचे नाव आहे. याबाबत डॉ. रामेश्वर विठ्ठलराव बंडगर (वय 28) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रामभाऊ सासवडे याने फिर्यादीना स्वतःच्या कार्यालयात बोलावले आणि शिक्रापूर गावच्या हद्दीत दवाखाना चालवायचा असेल तर दरमहा 25 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल असे सांगितले.
हप्ता दिला नाही तर गावात दवाखाना चालवू देणार नाही. गावातील लोकांना सांगून तुझ्याविरोधात खोट्या तक्रारी करायला लावीन, अशी धमकी देत खंडणीची मागणी केली.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.