Pune : गिरीश बापट यांच्याकडे केवळ 75 हजारांची रोकड!

एमपीसी न्यूज – पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत आजच्या बाजारमूल्यांनुसार सुमारे दोन कोटी 15 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. त्यांच्याकडे सध्या एकूण सव्वापाच कोटी लाख रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. बापट यांच्याकडे केवळ 75 हजारांची रोकड आहे. 

 जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री बापट यंदा लोकसभेची निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणूक लढविली. होती. त्यावेळी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती सुमारे 3 कोटी 10 लाख 71 हजार रुपये इतकी होती. लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
  • या शपथपत्रात बापट यांनी त्यांच्याकडे सव्वापाच कोटींची संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्याकडील वाहनांच्या ताफ्यात सव्वादोन लाखांची मर्सिडीज बेंझ, 18 लाखांची पजेरो या आलिशान गाड्यांसह आठ लाख रुपये किमतीचे महिंद्रा ट्रैक्टर आणि एक हजार रुपयांची स्कूटरचा समावेश आहे. तर, त्यांच्या पत्नीकडे 14 लाख 70 हजारांची हुंदाई क्रेटा गाडी असून, त्यांच्या नावे दागिने, मुदतठेवी आणि वाहन अशी एकूण 53 लाखांची मालमत्ता आहे.
बापट यांच्याकडे जडजवाहिर आणि दागिन्यांमध्ये एक लाख 33.हजार रुपये किंमतीचे 40 ग्रॅम सोने तर, त्यांच्या पत्नीकडे 120ग्रॅम सोने (स्त्रीधन) यांचा समावेश आहे. पाच वर्षांपूर्वीही त्यांच्याकडे जवळपास एवढेच दागिने होते. बापट यांच्याकडे केवळ 75 हजारांची रोकड आहे. मुंबई येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, संपदा बँकेत मुदत ठेवी, बचत खात्यात ठेवी आहेत. तर, संपदा बँक, जनता सहकारी बँक, टेल्को आणि विश्वेश्वर बँकेचे सुमारे 18 हजार रुपयांचे शेअर्स आहेत. बापट यांच्यावर पाच वर्षांपूर्वी बँकेचे सुमारे 25 लाखांचे कर्ज होते. सध्या त्यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे आठ लाख रुपयांचे कर्ज आहे. तर, पत्नीच्या नावे जनता सहकारी बँकेचे सुमारे 9 लाख 81 हजार रुपयांचे वाहन कर्ज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.