Pune : महाराष्ट्रीय मंडळाचे विजयादशमीला शंभरीत पदार्पण

योगासने, मल्लखांब, लेझीम, लाठी-काठी आदी प्रात्यक्षिकांच्या शोभायात्रेचे आयोजन

एमपीसी न्यूज – मराठी तरुणांना व्यायामाची (Pune) गोडी लागावी, भारतीय सैन्य दलात त्यांना स्थान मिळून त्यांच्या हातून देशसेवा घडावी या उद्देशाने 1924 साली कै. कॅप्टन शिवरामपंत दामले यांनी महाराष्ट्रीय मंडळ ही संस्था स्थापन केली. ही संस्था येत्या विजयादशमीला शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने संस्थेच्या वतीने आगामी वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, कार्याध्यक्ष अविनाश घाटपांडे, सरचिटणीस रोहन दामले व संस्थेच्या शिक्षण विभागाच्या संचालिका नेहा दामले यांनी पत्रकार परिषदेत दिली. संस्थेच्या नव्या बोधचिन्हाचे अनावरण देखील यावेळी करण्यात आले.

100 वर्षांत शारीरिक शिक्षणासोबतच शालेय, महाविद्यालयीन शिक्षणावर देखील संस्थेने भर दिला आहे. निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले म्हणाले, “मल्लखांब, कबड्डी, खोखो, योगासने यांसारख्या भारतीय क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने लवकरच त्यासंबंधीच्या एका सेंटर ऑफ एक्सलन्सची उभारणी महाराष्ट्रीय मंडळातर्फे करण्यात येणार आहे.

या सेंटरमध्ये भारतीय खेळांवर संशोधन व्हावे, तसेच या खेळांचे योग्य प्रशिक्षण विद्यार्थी व खेळाडूंना घेता यावे, यावर आमचा भर असेल. सेंटरसाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा या ‘इनडोअर’ पद्धतीने विकसित केल्या जातील.”

महाराष्ट्रीय मंडळाला क्रीडा विद्यापिठाचा दर्जा मिळावा हे आमचे ध्येय असून या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. सेंटर ऑफ एक्सलन्स बरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी स्पोर्ट्स सायन्स सेंटर आणि हाय परफॉर्मंस सेंटरही उभारण्यात येईल.

या ठिकाणी खेळाडूंना आवश्यक न्यूट्रिशन, स्ट्रेन्थ ट्रेनिंग, स्पोर्ट्स थेरपी, स्पोर्ट्स सायंटिस्ट, बायोमेकॅनिक्स, स्पोर्ट्स सायकॉलॉजी आदी बाबतीत योग्य मार्गदर्शन मिळेल. तसेच या विषयांसंबंधी अभ्यासक्रम सुरु करून इच्छुक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणही देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. नजीकच्या भविष्यात आमच्या महाविद्यालयांमध्ये बीबीए सारखे अभ्यासक्रम देखील सुरु केले जातील. सध्या वाणिज्य शाखेचे पदवी अभ्यासक्रम महाविद्यालयात उपलब्ध असल्याचेही गोखले म्हणाले.

Pune : रोहित्रांच्या ठिकाणी वीज सुरक्षेसाठी फायबर प्लस्टिकचे संरक्षक कुंपण

विजयादशमीला शोभायात्रेचे आयोजन

शताब्दी वर्षात पदार्पण करीत असताना येत्या विजयादशमीला (मंगळवारी, दि. 24) सकाळी 07.30 वाजता टिळक रस्त्यावरील (Pune) संस्थेच्या आवारातून शोभायात्रेला सुरुवात होईल. संस्थेच्या आवारातून निघालेली शोभायात्रा अभिनव चौकापर्यंत जाईल. या शोभायात्रेत संस्थेतील विद्यार्थ्यांची योगासने, मल्लखांब, लेझीम, लाठी-काठी यांची प्रात्यक्षिके होतील.

विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती या विषयावर बसविलेले पथनाट्य हे शोभायात्रेचे आकर्षण असणार आहे. पुढे मुकुंदनगरच्या मुख्य चौकापासून मुकुंदनगर येथील संस्थेचे आवार असा शोभा यात्रेचा दुसरा टप्पा असेल. तिथे शोभायात्रेचा समारोप होईल. याच दिवशी पहाटे पाच वाजता टिळक रस्त्यावरील संस्थेच्या आवारात परंपरेप्रमाणे जोर मारण्याचा कार्यक्रम होईल.

जो स्पर्धक एक हजार जोर मारेल त्याचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी आतापर्यंत 150 जणांनी नोंदणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.