Pune : पंतप्रधानांच्या आढाव्यानंतर पुणे मेट्रोचा मार्ग बदलणार- प्रकाश जावडेकर

एमपीसी न्यूज- पुणेकरांसाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प असणाऱ्या मेट्रो प्रकल्पाला विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक प्राधिकरणा’ने (नॅशनल मॉन्युमेंट मिशन) परवानगी नाकारल्यामुळे ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’कडून (महामेट्रो) वनाझ ते रामवाडी या मेट्रो मार्गातील आगाखान पॅलेसजवळ मेट्रोचा मार्ग बदलण्यात येणार आहे. त्याची तयारी सुरू झाली असून, लवकरच नवीन आरेखन केले जाणार आहे; तसेच स्वारगेट ते पिंपरी चिंचवड या मार्गातील रेजहिल्स येथील लष्कराच्या ताब्यातील जागा महामेट्रोला देण्याचा निर्णय झाला आहे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: याबाबतचा आढावा घेतला होता. त्यानुसार महाराष्ट्र सरकार आणि केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाला आदेश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘आगाखान पॅलेसजवळ राष्ट्रीय संरक्षित स्मारक प्राधिकरणाने मेट्रोच्या बांधकामाला परवानगी नाकारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: याबाबतचा आढावा घेतला आहे. आगाखान पॅलेस येथे मेट्रोचा मार्ग बदलण्यात येणार आहे. त्याबाबत आरेखन तयार करण्यात येत आहे. स्वारगेट ते पिंपरी चिंचवड या मेट्रो मार्गात रेंजहिल्स येथे संरक्षण खात्याच्या हद्दीतील जागेचा ताबा महामेट्रोला देण्याबाबतही चार दिवसांपूर्वी निर्णय घेण्यात आला आहे.’ ‘मेट्रोची मागणी आता वाढत आहे. मेट्रोबरोबरच बस वाहतूक, रस्ते, रिंगरोड झाल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे लोक येतील’ असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.