Pune : मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम नोव्हेंबरपासून सुरु करणार

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गासाठीचे पहिले टनेल बोअरिंग मशिन (टीबीएम) ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात सिंगापूरच्या ‘टेराटेक’ कंपनीतर्फे भारतात पाठविण्यात येणार असून, ते सप्टेंबरमध्ये मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईत विविध सुट्या भागांच्या स्वरूपात हे मशिन पोहोचल्यानंतर पुण्यात त्याची एकत्रित जोडणी केली जाणार आहे. एक नोव्हेंबरपासून कृषी महाविद्यालयाच्या येथून भुयारीकरणाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) निश्चित केले आहे.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आणि भुयारी मार्गाचे कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ यांच्यासह महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच सिंगापूर येथे पुणे मेट्रोसाठी सुरू असलेल्या ‘टीबीएम’च्या उत्पादन प्रक्रियेची पाहणी केली. महामेट्रोने निश्चित केलेल्या निर्धारित मुदतीपूर्वीच टीबीएमचे उत्पादन पूर्ण होणार असून, ऑगस्टमध्ये त्याची चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीनंतर ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये हे मशिन सिंगापूरहून पाठविले जाणार आहे.

  • ‘पुण्यात चार टीबीएमद्वारे भुयारी मार्गासाठीच्या बोगद्याची निर्मिती केली जाणार आहे. त्यापैकी, पहिले टीबीएम सप्टेंबरमध्ये पुण्यात पोहोचणार आहे. हे मशिन येईपर्यंत कृषी महाविद्यालय येथील शाफ्टचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये या मशिनची जोडणी पूर्ण करून ते शाफ्टमध्ये उतरविण्यात येणार आहे,’ अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. शाफ्टमध्ये मशिन उतरविल्यानंतर एक नोव्हेंबरपासून कृषी महाविद्यालयापासून भुयारी मेट्रोचे प्रत्यक्ष काम सुरू होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भुयारी मेट्रोचे संपूर्ण काम दोन टप्प्यांत केले जाणार आहे. कृषी महाविद्यालय ते बुधवार पेठ आणि स्वारगेट ते बुधवार पेठ स्टेशन अशा टप्प्यांतील हे काम टाटा-गुलेरमाक यांच्यातर्फे केले जाणार आहे. या दोन्ही टप्प्यात शिवाजीनगर, धान्य गोदाम (सिव्हिल कोर्ट), बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशा पाच भुयारी स्टेशनची निर्मिती केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.