Pune: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा ‘सिटी टास्क फोर्स’! 

एमपीसी न्यूज – पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेचा सिटी टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे.  विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करण्यात आली आहे. 

या फोर्सद्वारे विलगीकरण कक्ष तयार करणे, रुग्णांचे सर्वेक्षण करणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्याकडे ‘सिटी टास्क फोर्स’च्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. कोरोना या राष्ट्रीय आपत्तीसंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करणे, जनजागृती करणे, विलगीकरण कक्ष, निदान, उपचार यंत्रणा उभारणे, खासगी रुग्णालयांशी समन्वय साधणे, समन्वय ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मालमत्ता व व्यवस्थापन उपआयुक्त राजेंद्र मुठे, विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल, अधीक्षक अभियंता शिवाजी लंके यांच्याकडे पुणे महापालिकेच्या ताब्यातील इमारतींमध्ये विलगीकरण कक्ष तयार करणे व त्यासाठी आवश्यक सिव्हिल, विद्युतविषयक कामे तातडीने पूर्ण करून घेण्याचे काम सोपविण्यात आले आहे. महापालिकेच्या वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी कोरोना विषाणू संदर्भात करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांसाठी आर्थिक तरतूद तातडीने देणेबाबत आदेश देण्यात आले आहेत.

शहरातील विविध भागांमध्ये जनजागृतीकरिता, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकरिता आवश्यक मनुष्यबळ देण्याची जबाबदारी घनकचरा व व्यवस्थापन सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, सामान्य प्रशासन विभागाचे उपआयुक्त अनिल मुळे, समाजविकास विभागाचे सुनील इंदलकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. डॉ. नायडू रुग्णालयासह विलगीकरण कक्षात स्वतंत्ररीत्या पिण्याचे पाणी आणि वापरण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पाणीपुरवठा मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना देण्यात आली आहे.

संबंधित आणखी बातम्या वाचा 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.