Pune Murder News : चारित्र्याच्या संशयातून भर रस्त्यात पत्नीचा गळा चिरून खून; पती पोलिसात हजर

एमपीसीन्यूज : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा चिरून खून करण्यात आला. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. खून करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. हडपसर परिसरातील बंटर बर्नाड शाळेजवळ हा प्रकार घडला.

अंजली नितीन निकम (वय २२, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती नितीन निकम ( रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, मूळ गाव दहिगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 वर्षांपूर्वी या दोघांचे लग्न झाले होते. त्यांना चार वर्षाचा मुलगा आहे. नितीन निकम हा भोसरीतील एका कंपनी इलेक्ट्रिशियनचे काम करतो. पत्नीवर असलेल्या चारित्र्याच्या संशयातून या दोघा नवरा -बायकोत नेहमी भांडण होत होते.

आज दुपारी देखील त्यांच्यात याच कारणावरून भांडण झाले. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून दहिगाव येथे जाण्यासाठी निघाले. यावेळी त्यांच्यात पुन्हा एकदा भांडण झाले. नितीन निकम याने भररस्त्यात दुचाकी थांबवून गळा चिरून पत्नी अंजलीचा खून केला.

दरम्यान खून केल्यानंतर नितीन निकम हा आत्महत्या करण्यासाठी निघाला होता. तत्पूर्वी त्याने भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला आणि स्वतः आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. परंतु, भावाने त्याला मुलाचे कारण पुढे करून आत्महत्या करू नको असे सांगितले. या सर्व प्रकारानंतर नितीन निकम स्वतः हडपसर पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने घडलेला प्रकार सांगितला.

हडपसर पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.