Pune : प्रतिक्रियात्मक लेखनाकडून वैचारिक बैठकीकडे व्हावा नवलेखनाचा प्रवास !

'सोशल मीडिया आणि नवलेखनाची परंपरा' या विषयावरील परिसंवादाचा सूर

एमपीसी न्यूज- ‘प्रतिक्रियात्मक लेखनाकडून वैचारिक बैठकीकडे नवलेखनाचा प्रवास व्हावा’ असा सूर अ.भा. मुस्लिम मराठी साहित्य संमेलनातील ‘ सोशल मीडिया आणि नवलेखनाची परंपरा ‘ या विषयावरील परिसंवादात उमटला !

मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ आणि महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आयोजित बाराव्या अ.भा. मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘सोशल मीडिया आणि नवलेखनाची परंपरा ‘ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्यात पत्रकार कलीम अजीज , प्रा. डॉ. समाधान इंगळे, ‘अक्षरनामा’ पोर्टलचे राम जगताप, पत्रकार हीना कौसर खान, कुणाल गायकवाड आदी नव्या पिढीचे प्रतिनिधी सहभागी झाले .

हिना कौसर खान म्हणाल्या, “नव माध्यमांवरील लिखाण करणारे तरुण पुस्तक न लिहिणारे पण तरीही लेखकच आहेत. काळ समजून घ्यायला या नोंदी उपयोगी पडतील. प्रतिक्रियात्मक लेखन या नव माध्यमांवर अधिक होत असले तरी ते उथळ नाही. मात्र, या लिखाणाचा वैचारिक बैठकीकडे प्रवास सुरू झाला पाहिजे”

कुणाल गायकवाड म्हणाले, “नव माध्यमातील लिखाणातून साहित्याची नवी सैद्धांतिक मांडणी होताना दिसत नाही. संशोधन केले पाहिजे, असा दृष्टीकोण दिसत नाही. प्रस्थापित साहित्यात जितका जातीयवाद नाही, तितका नव माध्यमात दिसतो. मात्र, एकाच कंपनीकडे नव माध्यमांची मालकी असणे धोक्याचे आहे”

अक्षरनामा’ पोर्टलचे राम जगताप म्हणाले, “भोवतालच्या घडामोडी समजून घ्यायला सोशल मीडिया उपयोगी पडतो. मुस्लीम तरुणांनी अजून अधिक प्रमाणात सोशल मीडियाकडे वळले पाहिजे. आपण कुठलीही गोष्ट फॉरवर्ड करताना स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की हा मजकूर विश्वासार्ह आहे का ? त्यातून सोशल मीडियावर फॉरवर्ड होणारा निम्मा फेक मजकूर कमी होईल. अनेक तरुण -तरुणी इथे सशक्तपणे, सकारात्मक व्यक्त होत आहेत, त्यातून प्रत्येकाला रोज नवी उमेद मिळेल”

अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्रा. समाधान इंगळे यांनी सोशल मीडियावरील दमदार नव लेखकांचा परिचय करुन दिला. निवडक उतारे वाचून दाखवले. ते म्हणाले, “सोशल मीडियामुळे नवी भाषा , नव्या इमोजीची अभिव्यक्ती निर्माण होत आहे. सामाजिक, राजकीय बदल होत आहेत. अॅडिक्शन देखील निर्माण होत आहे. प्रस्थापित माध्यमांनाही सोशल मीडियावरील टीकेने अनेकदा बदलावे लागले आहे”

दाहक मुजावर यांनी सूत्रसंचालन केले. फिरोज खान यांनी वक्त्यांचा सत्कार केला.

सकाळी 11 वाजता ‘मुस्लिम तरुणापुढील आव्हाने ‘या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता . त्यात डॉ एस एन पठाण, गणी आजरेकर ,चंद्रशेखर शिखरे ,डॉ फारुख तांबोळी ,हलीमा कुरेशी ,अझीम शेख आदी सहभागी झाले.

दुपारी दीड वाजता ‘प्रसारमाध्यमे आणि मुसलमान ‘ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यात डॉ जयदेव डोळे ,संजय आवटे , आमदार इम्तियाझ जलील ,बशीर मुजावर ,राज काझी ,अझीम शेख ,साजिद पठाण आदी सहभागी झाले .

सायंकाळी 4 वाजता ‘ धार्मिक ध्रुवीकरण आणि समतेच्या चळवळी ‘ या विषयावर परिसंवाद झाला. त्यात डॉ रत्नाकर महाजन ,अन्वर राजन ,निरंजन टकले ,डॉ सय्यद रफिक पारनेरकर , ह भ प डॉ सुहास फडतरे महाराज ,डॉ सुदाम राठोड आदी सहभागी झाले .

सायंकाळी 7 वाजता ‘अनुवंशिक गैरसमज ‘ ही एकांकिका सादर झाली . रात्री साडेसात वाजता ‘मुस्लिम यशस्वी उद्योजकांशी संवाद ‘ या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. तर रात्री 9 वाजता ‘मिला जुला मुशायरा ‘ रंगला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.