Pune News : अँमिनिटी स्पेस भाड्याने देण्यास आम आदमी पार्टीचा विरोध

एमपीसी न्यूज – शहरातील अँमिनिटी स्पेस दीर्घकालीन म्हणजे 30  वर्षांच्या करारावर देण्याच्या योजनेला आम आदमी पार्टीने जाहीर विरोध केला आहे. गुरुवारी मुख्य सभेत हा विषय येणार आहे. स्थायी समितीने यास आधीच मान्यता दिली आहे.

जवळपास 270 जागा या मार्गाने खासगी विकसकांना उपलब्ध होतील. सुरवातीस 30 वर्षे आणि नंतर 90 वर्षांपर्यंत हे करार होऊ शकतील. या धोरणाचा पुण्याच्या विकासावर दीर्घकालीन गंभीर परिणाम होणार आहेत.

विकास नियमन कायद्यानुसार नागरी सोयी सुविधांसाठी म्हणजे बागा, क्रीडांगणे, पार्किंग, शाळा, आरोग्य केंद्रे, पोस्ट ऑफिस, पोलीस कुकी, वाचनालय, विरंगुळा केंद्र आदीसाठी या जागांचा वापर अपेक्षित आहे. जनतेला याच सुविधा हव्या असतात. परंतु, या ऐवजी जनतेला बाकडी, पदपाथवर वाचनालय, चौकात आठवडे बाजार, रस्त्यावर व्यायाम उपकरणे देऊन फुटकळ स्वरूपातील सुविधा देऊन प्रस्थापित पक्षातील नगरसेवकांनी ‘टक्केवारीसाठी सुविधा’ अशी कल्पना पुण्यात राबवली आहे.

त्यातून महिलांची सार्वजनिक स्वच्छतागृहे, मुलांची क्रीडांगणे, बालवाड्या, पाळणाघरे, प्राथमिक आरोग्य सुविधा केंद्रे, पार्किंग जागा यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या बाबत न्यायालयाने वेळोवेळी महापालिकेस फटकारले सुद्धा आहे.

आता या जागा म्हणजे स्थानिक नागरिकांच्या गरजेनुसार, उद्दिष्टानुसार तयार करायच्या सुविधा असतात. खरेतर या जागा पुढच्या पिढीतील नागरिकांसाठी शहरीकरणातील फुफुसे असतात. असे असताना 1700 कोटी एका फटक्यात मिळवून भावी पिढीसाठीच्या सुविधांचा बळी दिला जाणार आहे. हे तर ‘घर गहाण टाकून उचल’ मिळवण्याचे धोरण आहे. ‘सार्वजनिक मालमत्तेचे विश्वस्त’ असलेले नगरसेवक या जागा काही तातडीच्या फायद्यांसाठी खासगीकरणाकडे वळवत आहेत.

त्यातून ‘ज्याला परवडेल त्याला सुविधा’ असे धोरण तयार होते व सामान्य नागरिक वंचित ठरतो हे आपण शाळा व दवाखान्याबाबत अनुभवले आहे. या सर्व बाबी विचारात घेता आम आदमी पार्टी या अँमिनिटी जागा दीर्घकालीन भाडेकराराने देण्यास विरोध करीत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.