Pune News : खासदार संजय राऊत यांना अटक करा; पुणे भाजपची मागणी

एमपीसी न्यूज -‘कोथळा बाहेर काढू हे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेले कथित विधान धमकवणारे आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी करीत खासदार राऊत यांनी माफी मागितली नाही तर त्यांना अन्यथा पुण्यात फिरू देणार नाही, असा इशारा भाजप शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांनी दिला.

डेक्कन पोलीस ठाण्यात आज (दि.६ सप्टेंबर) या संदर्भात शहर भाजपच्या वतीने तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत मुळीक म्हणाले, “संजय राऊत हे केवळ एक बोरुबहाद्दर आहेत.वादग्रस्त वक्तव्य करून राजकारण करत असतात. ते प्रत्यक्ष फिल्डवर कधीही काम करत नाहीत. त्यांच्यात निवडणूक लढविण्याची हिंमत नाही. कोथळा बाहेर काढू ही एक प्रकारे धमकी आहे, ती आम्ही खपवून घेणार नाही.”

‘कानाखाली मारली असती’ या विधानानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली होती. त्याच न्यायाने राऊत यांनाही न्यायाने कलम 503, 505, 153 ब नुसार अटक करावी. जर गुन्हा दाखल केला नाही तर राज्यभरात आंदोलन पडसाद उमटतील. केवळ स्वार्थासाठी शिवसेना निष्ठा मात्र राष्ट्रवादीशी अशी राऊतांची शैली आहे. राऊत यांनी जाहीर माफी मागितल्याशिवाय त्यांना पुण्यात फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज स्वीकारला असून त्यावर विधी विभागाचा सल्ला घेऊन योग्य ती कार्यवाही करू, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी दिली.

यावेळी सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दिपक पोटे, दीपक नागपुरे, संदीप लोणकर, इशानी जोशी, संजय देशमुख यांच्यासह कायदा विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.