Pune News : दिल्लीतील शेतकर्‍यांचे आंदोलन बदनाम करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न : अरुंधती रॉय

एमपीसी न्यूज : केंद्र सरकारने मूठभर उद्योगपतींच्या फायद्यासाठी अध्यादेश काढून तीन कृषी कायदे लादले आहेत. हे सर्व कायदे मागे घेतले पाहिजे. त्यासाठी मागील दोन महिन्यापासून दिल्लीत लाखोंच्या संख्येने शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहेत. मात्र ते आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे, अशा शब्दात सामजिक कार्यकर्त्या, लेखिका अरुंधती रॉय यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारवर निशाणा साधला.

तसेच मी दिल्ली येथील आंदोलकांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

श्री गणेश कला क्रिडा रंगमंच येथे आयोजित एल्गार परिषदेत अरुंधती रॉय बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना अरुंधती रॉय म्हणाल्या, आपल्या येथील पेशवाई गेली, पण अद्यापही ब्राम्हणवाद असून त्याचाच एक भाग म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्राम्हण आणि वैश्य यांच्या मदतीने देशाचा कारभार चालवित आहे. त्यामुळे येणार्‍या काळात ही व्यवस्था आपणास मोडून काढायची आहे.

या विरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. मात्र, मागील काही दिवसांमध्ये जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अशा गोष्टींना आपण बळी पडू नये आणि सर्वानी एकत्रित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आपल्या देशात ज्यावेळी करोना आजाराचे संकट आले. तेव्हा लाखो नागरिकांच्या नोकर्‍या गेल्या. मात्र, त्याचदरम्यान अंबानी, अदानी, मित्तल यांच्यासारख्या अनेक उद्योगपतींच्या संपत्तीमध्ये कमालीची वाढ झाली. यातून अनेक प्रश्न निर्माण होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

तसेच आपल्या देशातील उद्योगपती, प्रसारमाध्यमे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार काम करीत आहे. त्यामुळे मोदींच्या विरोधात कोणीही बोलण्यास तयार नाही. तर दुसर्‍या बाजूला मागील सात वर्षात एकदाही मोदी मीडियाला सामोरे गेले नाही, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांच्यावर त्यांनी थेट निशाणा साधला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.