Pune News: ‘मला माझं काम करू द्या’; पार्थ प्रकरणावर अजित पवार यांची चुप्पीच

Pune News: deputy chief minister Ajit Pawar's silence on Parth pawar case बिहार विधानसभा निवडणुकीत या मुद्यावर राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी जोर धरत आहे.

एमपीसी न्यूज – मला माझं काम करू द्या, मला कुणाशीही काही काही बोलायचं नाही, अशा शब्दांत प्रतिक्रिया देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अजित पवार यांनी अद्यापही या प्रकरणावर चुप्पी साधल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एरवी तडकाफडकी बोलणारे अजित पवार सध्या कमालीचे शांत आहेत. त्यांची ही शांतता वादळ येण्यापूर्वीचे संकेत तर नाही ना, असा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी पार्थ पवार यांनी केली होती. त्यावर पार्थ पवार अपरिपक्व आहेत. माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही,” अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कान टोचले होते. त्यामुळे पार्थ पवार नाराज असल्याची खमंग चर्चा सुरू आहे.

2019 च्या मावळ लोकसभा निवडणुकीत पार्थ यांच्या उमेदवारीला शरद पवार यांनी जोरदार विरोध केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेत आहेत.

यादरम्यान पत्रकारांनी अजित पवार यांना पार्थ प्रकरणावर बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी या प्रकरणावर सध्या शांत राहणेच पसंत केले. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरुन महाराष्ट्र व बिहार राज्यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत या मुद्यावर राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी जोर धरत आहे. सध्या पार्थ पवार कमालीचे नाराज असल्याचे माध्यमातून बोलले जात आहे. त्यातच अजित पवार काहीच बोलत नसल्याने अणखीच उत्सुकता लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.