Pune News: महापालिका इमारतीत ई चार्जिंग स्टेशन उभारणार

एमपीसी न्यूज :पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये आणि सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पॉइंट तयार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, भारत ही जगातील चौथी वाहन बाजारपेठ आहे. जगाच्या तुलनेत देशातील वाहनांची संख्या खूप मोठी आहे. भारताला त्याच्या इंधन क्षमतेच्या  80 टक्के कच्चे तेल अन्य देशांतून आयात करावे लागते. फॉसिल इंधनरहित वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे इंधनाची गरजही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

रासने पुढे म्हणाले, इलेक्ट्रिक वाहने शून्य उत्सर्जन देतात. त्यामुळे कार्बन डाय ऑक्साईड   तसेच इतर धोकादायक वायू कमी होण्यास मदत होते. पेट्रोल, डिझेलवरील वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांचा दैनंदीन खर्च आणि देखभाल खर्च कमी आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये चार्जिंग स्टेशनवर चार्ज केलेल्या बॅटरी बदलून घेता येतात. इलेक्ट्रिक चार्जिंग  पॉईंटमुळे  या वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.