Pimpri News: मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकासआघाडीची भाजप, केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना सुडबुद्धीने, दडपशाहीने अटक केल्याचा आरोप करत अटकेच्या कारवाई विरोधात महाविकास आघाडीतील पक्षांनी भाजप, केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आज (शुक्रवारी) झालेल्या आंदोलानात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले, माजी महापौर संजोग वाघेरे, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा कविता आल्हाट, काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सायली नढे, शिवसेनेच्या महिला संघटिका उर्मिला काळभोर, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, गोरक्ष लोखंडे, काळुराम पवार, राजेंद्र जगताप, नगरसेविका स्वाती काटे, माजी नगरसेविका शमिम पठाण, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, रविकांत वर्पे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, सुनील गव्हाणे, वर्षा जगताप, सारिका पवार, पल्लवी पांढरे, मनिषा गटकळ आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, ”मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्या रागातून भाजपने ईडीच्या माध्यमातून त्यांना अटक केली. भाजपचे नेते याला त्याला अटक होणार असे सांगतात. भाजपमध्ये गेल्यानंतर वाल्याचा वाल्मिकी होते. तक्रारी बंद होतात. भाजपमध्ये गेला की भ्रष्टाचार संपतो. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले होते मी भाजपमध्ये गेल्याने शांत झोप येते. हे सर्व राज्यातील जनता पाहत आहे. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले नाही. त्याचे भाजपला वाईट वाटत आहे. काहीही करुन सरकार पडत नाही. हे लक्षात आले. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने महाविकास आघाडीतील मंत्र्यांना नाहक त्रास दिला जात आहे. महाराष्ट्र कधीच दिल्लीपुढे झुकला नाही आणि यापुढेही झुकणार नाही. देशात अनेक प्रश्न असून त्याकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन जनतेचे दुसरीकडे लक्ष वेधण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. त्यामुळे यापुढे एकजुटीने भाजपविरोधात लढावे लागणार आहे”.

काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम म्हणाले, ”केंद्र सरकार ईडी, सीबीआयच्या माध्यमातून महाराष्ट्रावर अन्याय करत आहे. महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. विनाकारण त्रास दिला जात आहे. लोकहिताचे काम करणा-या महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे”.

शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले म्हणाले, ”केंद्र सरकार ईडी सारख्या यंत्रणांना हाताशी धरुन महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडी सरकार पाडणे सोपे नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन सरकार एक विचाराने चांगले काम करत आहे. त्यामुळे भाजपवाले हतबल झाले असून खोटे गुन्हा दाखल करुन सरकारला बदनाम करत आहेत. महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत असल्याने भाजपचा पोटशूळ उठला आहे”.

माजी महापौर संजोग वाघेरे म्हणाले, ”अडीच वर्षांपासून महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहेत. विरोध करायला भाजपला कोणताही मुद्दा हातात मिळत नाही. महाविकास आघाडी सरकारला धक्का लावू शकले नाहीत. त्यामुळे सरकारला डिस्टर्ब करण्यासाठी ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या माध्यमातून त्रास दिला जात आहे. भाजपने हा नवीन उद्योग सुरु केला आहे”.

”बीजेपी हमसे डरती है, ईडी को आगे करती है”, ”मोदी जब जब डरते है, तब तब ईडी को आगे करते है”, ”शर्म करो, शर्म करो, मोदी सरकार शर्म करो”, ”भाजप वाल्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय”, ”नवाबभाई आगे बडो, हम तुम्हारे साथ है”, ”गांधी लडे थे गोरे से, हम लढेंगे चोरे से”, ”भाजप सरकार हाय, हाय, भाजप सरकार हाय हाय” अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.