Pimpri News: पवना धरणात 58 टक्के पाणीसाठा; जूनअखेरपर्यंत पुरेल पाणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरणात 58 टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा जून अखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. उन्हाळा सुरु झाला असून पाण्याचा वापर वाढला आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले.

मागील वर्षी आज आखेर 64.43 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पवनाधरणात 6 टक्‍क्‍यांनी पाणीसाठा कमी झाला आहे. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने सप्टेंबरमध्येच पवना धरण 100 टक्के भरले होते. यावर्षी 1 जूनपासून आजअखेर 2716 मीमी एवढा पाऊस झाला आहे.

मावळ आणि पिंपरी-चिंचवडकरांनी पाण्याचा जपून वापर करणे आवश्‍यक आहे. अजून उन्हाळ्याला सुरुवात होत आहे. दुपारी उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. परंतु पुढे मार्च, एप्रिल, मे आणि जून महिना बाकी आहे. मागील काही वर्षांचा मान्सून आगमनाची परिस्थिती पाहिली असता यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेत झाले नाही. तर, मावळासह शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे पाण्याचा पावर जपून करणे आवश्‍यक आहे, अशी माहिती पवना पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

पवना धरणाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अन्वर तांबोळी म्हणाले, ”पवना धरणात 58.46 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा साधारणतः जून अखेरपर्यंत पुरेल. गतवर्षीपेक्षा 6 टक्के पाणीसाठा यंदा कमी आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. महापालिका सध्या प्रतिदिन 480 ते 490 एमएलडी पाणी उचलत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.