Pune News : स्वीगीसारख्या कंपन्यांकडून कामगारांची पिळवणूक : मनसे

एमपीसी न्यूज – स्वीगीसारख्या कंपन्यांकडून कामगारांची पिळवणूक होत असल्याची माहिती  मनसेचे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे सोमवारी ( दि. 21 सप्टेंबर) स्वीगी या फूड डिलव्हरी करणाऱ्या कंपनीच्या हजारो कामगारांनी आपल्या व्यथा मांडल्या. त्यांच्यावर होत असलेल्या पिळवणुकीची माहिती दिली. गेले काही महिने सातत्याने या व समकक्ष कंपन्यांच्याकडून त्यांच्याकडे काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉय व गर्ल्सचे आर्थिक शोषण व पिळवणूक करून कामगार कायद्याचा भंग करण्यात येत आहे.

असंघटित कामगार, नोकरीची नसलेली हमी, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी या गोष्टी या कामगारांच्या डोक्यावर असल्याचा गैरफायदा संबंधित कंपन्या घेत आहेत.  कामगारांनी न्यायहक्काची मागणी केली असता पोलीस आणि कामावरून काढून टाकण्याची धमकी देण्यात येते, त्याचप्रमाणे नव्याने कामगार भरती करण्याची भीती घालण्यात येते, हे सारे प्रकार कामगारांना गुलाम म्हणून वागवण्यात येते याच प्रतीक आहे, असा आरोपही शिंदे यांनी केला.

या संदर्भात स्वीगीकडून मनसेशी संपर्क करण्यात आला असून मंगळवारी (दि. 22 सप्टेंबर) स्वीगीचे अधिकारी भेटण्यास मनसे पक्ष कार्यालयात 11 वाजता येणार आहे.

स्वीगीच्या फूड डिलिव्हरी कर्मचारी यांच्यावर सतत होणाऱ्या अन्यायामुळे आणि त्यांच्या विविध मागण्यांसाठी आज स्वीगी फूड डिलिव्हरी कर्मचारी यांनी मनसेकडे दाद मागितली. यावेळी पुणे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी स्वीगीच्या सर्व फूड डिलिव्हरी कर्मचारी यांना मनसे योग्य तो न्याय मिळवून देईल, असे सांगत सर्व कर्मचारी यांनी संघटित व्हावे असे  सांगितले. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मा नरेंद्र भाऊ तांबोळी यांनी कामगार सेना कायदेशीर लढाई लढून न्याय मिळवून देईल असे सांगितले.

यावेळी मनसेचे विभाग अध्यक्ष सुनिल कदम, उपशहर अध्यक्ष प्रल्हाद गवळी, प्रभाग अध्यक्ष मनोज ठोकळ, मनविसे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य रुपेश घोलप, रोजगार विभाग अध्यक्ष दत्ता माळी,शाखा अध्यक्ष कैलास पोडमल शाखा उपाध्यक्ष जय जगताप आणि स्वीगीचे ईश्वर माळी, सतीश बल्लाळ यांच्यासह स्वीगीचे कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.