Pune News : भय इथले संपत नाही ! शस्त्राचा धाक दाखवून भरवस्तीत दहशत

एमपीसी न्यूज –   पुण्यातील सहकारनगर परिसरात दोन तरुणांनी भरदिवसा गोंधळ घालत हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत पसरवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. 19 आणि 16 वर्षीय तरुणांनी शंकर महाराज वसाहत परिसरात हा धिंगाणा घातला. याच परिसरात काही दिवसांपूर्वी हातात कोयते आणि तलवारी घेऊन गुन्हेगारांनी दहशत पसरवल्याची घटना घडली होती. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड केली होती. या घटनेला काही दिवस होतात न होतात तोच याच परिसरात आणखी एक प्रकार उघडकीस आलाय. 

 

याप्रकरणी कृष्णा सुभाष वैराळ (वय 19, रा. दिग्विजय कॉलनी, लेन नं 4, संतोष नगर कात्रज) त्याच्यासह एका 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर महाराज वसाहत परिसरात राहणाऱ्या एका नागरिकाने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी कृष्णा याने  फिर्यादीला “मला घाबरून राहायचे, मी या वस्तीचा दादा आहे, आत्ताच तुला संपवून टाकतो” असे म्हणून हातातील लोखंडी हत्याराने फिर्यादीवरून वार केला. परंतु हा वार चुकून फिर्यादी घरात पळून गेले. त्यानंतर आरोपीने या परिसरात असणाऱ्या पाच दुचाकी आणि एक चार चाकी गाडीची तोडफोड केली. त्यानंतर हातातील हत्याराचा धाक दाखवून मोठमोठ्याने आरडाओरडा करत “मीच इथला दादा आहे” असे बोलून दहशत निर्माण केली. त्याचा हा रुद्रावतार बघून वस्तीतील नागरिक लपून बसले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.