Mumbai News : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापालिका आयुक्तांनी स्वीकारला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार

एमपीसी न्यूज – ‘प्रशासकीय गतिमानता व सर्वोत्कृष्ट कल्पना’ या वर्गवारीत महापालिका गटात पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रथम क्रमांक पटकावल्याबददल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना आणि कार्यपद्धतींचा अंगीकार, ई- गव्हर्नन्स तसेच लोकाभिमुख कार्यालय या उपक्रमांत पिंपरी-चिंचवड महापालिका अव्वल ठरल्याने दहा लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अप्पर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे आदींसह राज्यातील विविध विभागातील अधिकारी व पुरस्‍कारार्थी उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारतेवेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड उपस्थित होते.

नागरिकांना सहजतेने गतिमान सुविधा दिल्यास ते ख-या अर्थाने सुशासन ठरेल. दप्तर दिरंगाई सारखे शब्द खोडून टाकण्यासाठी आणि नागरिकांना दाखवलेली स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी प्रशासकीय गतिमानता आवश्यक आहे. त्यासाठी कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना आणि कार्यपद्धती, ई- गव्हर्नन्स तसेच लोकाभिमुख कार्यालयांचा अंगीकार करणे गरजेचे असून गतिमान सुविधा व नविन संकल्पना आत्मसात करून अत्याधुनिक प्रशासकीय यंत्रणेचा अवलंब केल्यास तत्पर सेवेमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाची प्रतिमा उंचावेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

कोविड काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून, कुटूंबापासून दूर राहून शासकीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम केल्यामुळे या संकटाचा आपण मुकाबला करू शकलो अशा गौरवपूर्ण शब्दात मुख्यमंत्र्यांनी याकाळात केलेल्या कामाचे कौतूक केले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्व पारितोषिक प्राप्त अधिकारी- कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत नागरी सेवा हक्क दिनाच्या शुभेच्छा दिल्या.आपली निष्ठा, कर्तव्यभावना राज्य आणि देशाच्या विकासासाठी, सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी जपावी, महाराष्ट्र हे आपल्या सर्वांचे मोठे कुटूंब आहे त्याच्या सुखासाठी काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यानिमित्ताने केले.

प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता आणि निर्णयक्षमता आणण्याकरता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा” ही योजना राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आली होती. राज्यस्तरावर प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत सर्वोत्कृष्ट कल्पना आणि उपक्रम सुचविणाऱ्या शासकीय संस्था, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी 4 वर्गवारीत सदर स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेसाठी सर्व स्तरांवरून ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात आले होते. या अभियानांतर्गत राज्यस्तरावर प्राप्त प्रस्तावांची छानणी तसेच परीक्षण राज्यस्तरीय निवड समितीने केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. महापालिकेने केलेले काम राज्यात अव्वल ठरले असून त्यासाठी प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाल्याने शहराचा बहुमान वाढला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.