Pune News: सभागृह नेते धीरज घाटे यांच्यासह कुटुंबातील 11 जणांची कोरोनावर मात

कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतरही धीरज घाटे घरी बसून आवश्यक ती सूत्रे हलवित होते. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रयत्नशील होते.

एमपीसी न्यूज – गणेश चतुर्थीच्या आधी काही दिवस कोरोनाची बाधा झालेले सभागृह नेते धीरज घाटे आता पूर्णपणे ठणठणीत बरे झाले आहेत. घाटे यांच्या कुटुंबातील 11 जण ‘पॉझिटिव्ह’ आले होते. त्यांनीही वेळेत उपचार घेऊन या आजारावर विजय मिळविला आहे.

गणपती मंडळाचे सच्चे कार्यकर्ते आणि गेल्या काही वर्षांमध्ये साने गुरुजी तरुण मंडळ नावारुपास आणणाऱ्या धीरज घाटे यांना यंदा संपूर्ण गणेशोत्सव काळात कोरोनामुळे ‘होम क्वारंटाइन’ रहावे लागले. कोरोनाचे महासंकट पुण्यावर आल्यानंतर रस्त्यावर उतरून नागरिकांच्या मदतीसाठी घाटे धावून गेले. त्यातूनच त्यांना कोरोनाची लागण झाली.

सभागृह नेते म्हणून काम करताना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड्स कसे वाढतील, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. पुणे महापालिकेच्या माध्यमातून पुण्याच्या विविध भागांत कोविड सेंटर सुरू करण्याचे नियोजन केले. नागरिकांना कोविड वॉररूमच्या माध्यमातून अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी यंत्रणा सक्षम करण्याचे प्रयत्न केले.

शहरात काम करतानाच प्रभागातही सर्व व्यवस्था योग्य पद्धतीने लावली. प्रभाग क्रमांक 29 आणि शहराच्या विविध भागातील पंधरा हजारांहून अधिक कुटुंबीयांची चूल पेटती रहावी, यासाठी घाटे यांनी गरीब आणि गरजू कुटुंबांना शिधावाटप केले.

हजार कुटुंबांना सलग काही दिवस भाजी वाटप केले. वस्ती विभागांमध्ये जाऊन नागरिकांचे स्क्रिनिंग केले आणि धोका असलेल्या नागरिकांची स्वतंत्र तपासणी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे भरविली. पंधरा हजारहून अधिक नागरिकांच्या घरी जाउन मोफत सॅनिटायझर नि मास्कचे वितरण करण्यात आले. प्रभागातील सर्व वस्त्यांच्या निर्जंतुकीकरणाची मोहीम राबविण्यात आली.

वस्ती विभागांमध्ये फिरत्या दवाखान्याची व्यवस्था करण्यात आली. किरकोळ आजारांवरील औषधे नागरिकांना मोफत देण्याची व्यवस्था करण्यात आली. सणस स्पोर्ट्स ग्राउंड येथील कोविड सेंटर येथे साने गुरूजी तरुण मंडळाच्या दोन रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या.

कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतरही धीरज घाटे घरी बसून आवश्यक ती सूत्रे हलवित होते. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रयत्नशील होते. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि हॉस्पिटलमध्ये उपचार, अशा सर्व विषयांमध्ये स्वतः लक्ष घालीत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.