Pune News : ‘स्मार्ट शहरे- स्मार्ट शहरीकरण’ या स्पर्धेतील ‘ओपन डेटा गव्हर्नन्स’ मध्ये पुण्याला पुरस्कार

एमपीसी न्यूज – भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने आयोजित “स्मार्ट शहरे : स्मार्ट शहरीकरण” या स्पर्धेत पुणे स्मार्ट सिटीला “ओपन डेटा गव्हर्नन्स” या इव्हेंटमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट दहा शहरांमध्ये स्थान मिळाले आहे. स्मार्ट सिटी मिशनचे जॉईंट सेक्रेटरी आणि मिशन डायरेक्टर कुणाल कुमार यांच्या हस्ते सुरत येथे दि. १९ एप्रिल रोजी झालेल्या कार्यक्रमात पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते आणि पुणे महापालिकेचे चीफ डेटा ऑफिसर राहुल जगताप यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

 

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने भारताच्या शहरी परिसंस्थेमध्ये नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रमांचा एक भाग म्हणून देशभरात 17 ते 21 जानेवारी दरम्यान “ओपन डेटा गर्व्हनन्स” कार्यक्रम आयोजित केला होता. या स्पर्धेत देशातील एकूण 62 शहरांनी सहभाग नोंदविला होता. तर 52 शहरांनी संकेतस्थळावर डेटासेट आणि डेटा स्टोरी अपलोड केल्या होत्या आणि 38 शहरांनी “डेटा डे” चे आयोजन केले होते. सहभागी शहरांनी 1300 हून अधिक डेटासेट प्रसिद्ध केले होत्या. या उपक्रमांचे मूल्यमापन केल्यानंतर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 10 शहरांमध्ये पुणे शहराला स्थान प्राप्त झाले आहे.

 

पुणे महापालिका आणि पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांचेमार्फत जानेवारी 2022 मध्ये “ओपन डेटा डे” अंतर्गत ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विविध कंपनी, महाविद्यालयांचे प्रतिनिधी, तज्ज्ञ व्यक्तींनी सहभाग नोंदवून शहरातील विविध समस्यांवर चर्चा केली. तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी ओपन डेटाचा वापर कशा प्रकारे करता येईल, याबाबत मंथन केले. यावेळी विषय तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. पुणे महापालिकेने सर्व विभागांशी समन्वय साधून डेटासेटस् आणि डेटा स्टोरीज संकलित करून अपलोड केल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.