Pimpri News : अधिकारी, कर्मचा-यांचे सांघिक यश अन् नागरी सहभागामुळेच महापालिकेला पुरस्कार – आयुक्त पाटील

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेला विविध उपक्रम आणि कार्याबद्द्ल मिळत असलेले पुरस्कार हे अधिकारी कर्मचा-यांचे सांघिक यश असून नागरी सहभागामुळेच हा गौरव झाला असल्याचे उद्गार आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी काढले.

भारत सरकार गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्मार्ट शहरे, स्मार्ट शहरीकरण या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल “ओपन डेटा विक”, “क्लायमेट चेंज” आणि “प्लेस मेकींग” या तीन पुरस्कारांनी नुकतेच सन्मानित करण्यात आले. तसेच कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना, कार्यपध्दतींचा अंगीकार, ई-गव्हर्नन्स आणि लोकाभिमुख कार्यालय या उपक्रमात राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता अभियान व स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यस्तरावर अव्वल ठरली असून राज्य शासनाच्या वतीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘ब’ वर्ग महापालिकांच्या गटात महापालिकेला महाराष्ट्र महापौर परिषदेतर्फे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित झाला. याबद्दल आज महापालिका अधिका-यांच्या वतीने प्रशासकीय नेतृत्व व मार्गदर्शन करणारे आयुक्त राजेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना आयुक्त राजेश पाटील बोलत होते.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, शहर अभियंता राजन पाटील, सह शहर अभियंता मकरंद निकम, संदेश चव्हाण, संजय खाबडे, अशोक भालकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य वित्त व लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्यासह सर्व उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

अधिका-यांशी संवाद साधताना आयुक्त राजेश पाटील म्हणाले, मिळालेला सन्मान हा टीम वर्कचा आहे. आयुक्त म्हणून महापालिकेची सूत्रे हाती घेऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला. कामाला योग्य दिशा आणि गती देण्याबरोबरच त्यात सूसुत्रता आणणे महत्वाचे असते. त्यासाठी मी टीम लीडर म्हणून प्रयत्न करतो. टीममध्ये उत्तम क्षमता असून उद्दिष्ट पूर्तीसाठी सर्वजण झटून काम करतात. पुण्याच्या सावलीत पिंपरी-चिंचवड शहर वाढले आहे. त्यामुळे शहराची स्वतंत्र ओळख निर्माण करुन ठसा उमटविण्यासाठी आपण काम करीत आहोत.

सर्व झोनमध्ये कटीबध्द राहून प्लेस मेकींगचा उपक्रम सर्वांनी प्रभावीपणे राबविला. पालिकेची प्रतिमा उंचाविण्यासाठी आणि लोकभावनेचा आदर करुन केलेल्या कामाचा प्रभाव लोकांपर्यंत पोहोचतो. कोणतेही काम लोकसहभागामुळे यशस्वीतेकडे वाटचाल करत असते. त्यादृष्टीने सर्व विभाग एकजीव होऊन काम करीत आहेत ही महत्वाची बाब असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, नवीन मापदंड तयार करुन प्रभावी कामकाज करण्यासाठी महापालिकेने नवे आयाम निर्माण केले आहे. पर्यावरण संतुलनासाठी महापालिका काम करीत आहे. माहितीचे संकलन आणि वर्गीकरण करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून इतर आस्थापनांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. या माहितीचा उपयोग करुन नागरिक संशोधन करतील. त्याचा फायदा विकासात्मक पाया आणि सोयी सुविधांसाठी निश्चितपणे होणार आहे.

नागरी सुविधा देत असताना नवे तंत्रज्ञान आणि प्रणालींचा अवलंब कामकाजात करावा लागणार आहे. यासाठी जगासोबत प्रवास करणे गरजेचे आहे. विविध पुरस्कार प्राप्तीबरोबरच उद्दिष्ट पूर्तीसाठी सर्वांनी झपाटून काम केल्यास त्यातून खरे समाधान आपल्याला मिळते. यासाठी वाढता लोकसहभाग आवश्यक असून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे संवाद प्रणालीचा उपयोग करण्याकडे आपला कल असला पाहिजे असे आयुक्त राजेश पाटील म्हणाले. आता भारतातील कोणत्याही शहराशी आपण स्पर्धा करु शकतो. देशातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज असून नागरिकांच्या सहकार्यातून आपल्याला यश नक्की प्राप्त होईल असा विश्वास आयुक्त पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.