Pune News – सन 2047 ची गरज लक्षात घेऊन 24 तास समान पाणीपुरवठ्याचे नियोजन

एमपीसी न्यूज –  पुणे शहराची सन 2047 सालची गरज लक्षात घेऊन पुणेकरांना 24 तास, शुद्ध, पुरेसा आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा करता यावा, या उद्देशाने ‘समान पाणीपुरवठा योजना’ या महत्त्वाकांक्षी योजनेचे काम सुरू आहे. या योजनेअंतर्गत शहरात 82 साठवण टाक्या बांधणे, 1800 किलोमीटरची जलवाहिनी टाकणे आणि 3 लाख 15 हजार जलमापक (मीटर) बसविणे आदी विकासकामांचा समावेश आहे.

 

नवीन आर्थिक वर्षात 65 साठवण टाक्या कार्यान्वित करणे, 400 किलोमीटर लांबीची नवीन वितरण व्यवस्था विकसित करणे, दीड लाख जलमापक बसविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. वारंवार जलवाहिनी फुटून पाणी वाया जाण्यास आता आळा बसणार आहे.

 

 

वर्षानुवर्षे ब्रिटिशकालीन अनेक जलवाहिन्या आहेत. त्या कधीही फुटू शकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. शहरात अपुरा होणारा पाणीपुरवठा, दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. तर, मुळशी धरणातून शहराला पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. पुणे शहराचे वाढते औद्योगिकीकरण आणि नागरिकरणामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. मुळशी धरणातून भविष्यकाळातील शहराची वाढती पाणीपुरवठ्याची गरज लक्षात घेऊन नियोजन करता येणे शक्य आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात 1 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

 

तसेच, लष्करासह शहराच्या पूर्व भागातील हडपसर आणि काही मध्यवर्ती पेठांना लष्कर जलकेंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. हे जलकेंद्र सुमारे सव्वाशे वर्षे जुने आहे. या केंद्रातील साठवण टाक्या, स्लॅब तकलादू झाले असून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. त्यामुळे या जलकेंद्राचा पुनर्विकास करून चारशे दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून थेट अशुद्ध पाणी पाठवून त्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करता येणार आहे. त्यासाठी 1 कोटी रुपये करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.