Pune News: पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन

पांडुरंग रायकर हे अतिशय अभ्यासू पत्रकार होते. पुण्यातील अनेक समस्या त्यांनी मांडल्या होत्या.

एमपीसी न्यूज – टीव्ही 9 वृत्तवाहिनीचे पुण्यातील प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे बुधवारी (दि.2) पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पांडुरंग रायकर हे अतिशय अभ्यासू पत्रकार होते. पुण्यातील अनेक समस्या त्यांनी मांडल्या होत्या. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पांडुरंगच्या आठवणीने पत्रकारांनाही अश्रू अनावर

पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यांच्या आठवणीने आज अनेक पत्रकारांना अश्रू अनावर झाले. 100 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार होत नसतील तर हे हॉस्पिटल उभारून काय उपयोग झाला, असा सवाल अनेक पत्रकारांनी उपस्थित केला.
पांडुरंग हा आपल्यामध्ये नाही, याची मोठी खंत असल्याचे पत्रकार वैभव सोनवणे यांनी सांगितले. पांडुरंगला बेडस उपलब्ध करून देण्यासाठी अनेक पत्रकारांनी प्रयत्न केले. आमच्या सहकाऱ्याची अशी अवस्था झाली असेल तर सर्वसामान्य नागरिकांची व्यवस्था काय असेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या जाम्बो सेंटरमध्ये 800 बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, डॉकटर आणि इतर स्टाफ नसल्याचे पत्रकार शैलेश काळे म्हणाले. केवळ उद्घाटन करण्यासाठी हे जम्बो कोविड सेंटर सुरू केले का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पुणे शहरात कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर झाली आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रसार पुणे शहरात वाढत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.