Pune News: माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त व नामवंत ईएनटी सर्जन डॉ. सुरेश घैसास यांचे निधन

एमपीसी न्यूज – नामवंत नाक, कान व घसा शल्यचिकित्सक (ईएनटी सर्जन) आणि माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्‍वस्त तसेच माजी अध्यक्ष डॉ. सुरेश गोविंद घैसास (वय 84) यांचे अल्प आजाराने सोमवारी पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले व नातवंडे असा परिवार आहे.

डॉ. सुरेश घैसास यांचे शालेय शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झाले. पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएस ही पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी कान, नाक, घसा या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. कानाच्या शस्त्रक्रियेवरील अभ्यासासाठी ते जर्मनीला गेले होते. त्यानंतर त्यांनी पुण्यात कान, नाक, घसा तज्ज्ञ म्हणून डेक्कन जिमखाना येथे क्लिनिक सुरु केले. अल्पावधीतच त्यांनी पुण्यातील एक नामवंत शल्यचिकित्सक म्हणून नावलौकिक प्राप्त केला.

बहिरेपणाच्या शस्त्रक्रियेवरील अनेक शोध निबंध त्यांनी लिहिले. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये कान, नाक व घसा या विभागाचे प्रमुख म्हणून 25 वर्षे अविरत सेवा केली. तसेच धोंडुमामा साठे वैद्यकीय महाविद्यालयात कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख प्राध्यापक म्हणून तब्बल तीन दशके काम केले. पुणे तसेच महाराष्ट्र कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉक्टरांच्या असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली.

माईर्स एमआयटीचे लातूर येथील एम.आय.एम.एस.आर. वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेत त्यांचा प्रमुख सहभाग होता. तळेगाव येथील मायमर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वैद्यकीय अधिकारी (मेडिकल ऑफीसर) म्हणून ३० वर्ष अविरत सेवा देऊन महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान दिले.

माईर्स एमआयटी या प्रसिद्ध शिक्षण संस्थेचे संस्थापक विश्‍वस्त होते. काही काळ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. माईर्स एमआयटी संस्थेला स्वतःची 16 एकर जमीन कोणताही मोबदला न घेता प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांच्याकडे सुपूर्त केली. आज त्यांच्या या योगदानामुळे व सक्रीय सहभागामुळे माईर्स एमआयटी ही शिक्षण संस्था नावारूपाला आली.

डॉ. घैसास हे अतिशय निर्मळ मनाचे आणि प्रेमळ स्वभावाचे होते. वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून हजारो रुग्णांना ते विनामूल्य सेवा देत होते. अनेक गरजूंचे व गोरगरीबांचे आयुष्य त्यांच्यामुळे बदलले गेले.

माईर्स एमआयटीची कधीही न भरून येणारी हानी – डॉ. विश्वनाथ कराड

चेहर्‍यावर सदैव हास्य ठेवून ते निरपेक्ष, निरलस व निर्मळ भावनेने आपले आयुष्य जगले. त्यांच्या अचानक जाण्याने संस्थेची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना, अशी भावना माईर्स एमआयटीचे संस्थापक प्रा. डॉ. विश्‍वनाथ  कराड यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.