Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस उभारणार शाहू महाराजांचे स्मारक : प्रशांत जगताप

एमपीसीन्यूज : पर्वती पायथा येथील श्री शाहू मंदिर महाविद्यालय आवारात असलेल्या लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाची दूरवस्था झाली आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या ठिकाणी मूळ पुतळ्याचे अस्तित्व कायम ठेवून नवीन स्मारक उभारण्यात येणार आहे. तसेच, नव्याने उभारले जाणारे स्मारक आणि विकसित परिसर यामुळे पुणे शहराच्या वैभवात निश्चितच भर पडणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त शनिवारी पर्वती पायथा येथील श्री शाहू मंदिर महाविद्यालयाच्या आवारातील शाहू महाराजांच्या स्मारकाला जगताप यांनी अभिवादन केले. तसेच, शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले.

जगताप म्हणाले, 50 वर्षांपूर्वी उभारलेल्या शाहू स्मारकाची सध्या दूरवस्था झाली असून, ती दूर करावी, अशी मागणी येथील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी केली. त्यास तत्काळ होकार देऊन, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या मूळ पुतळ्याचे अस्तित्व कायम ठेवून नवे स्मारक उभारण्यात येईल. स्मारक आणि स्मारकाभोवतीचा विकसित परिसर यामुळे पुणे शहराच्या वैभवात निश्चितच भर पडेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

येत्या काही दिवसांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येथील स्मारकाचे भूमिपूजन केले जाईल आणि पुढील २६ जून रोजी म्हणजेच, राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन करण्यात येईल. या स्मारकासाठीचा संपूर्ण खर्च पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात येईल, असेही जगताप म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.