Pune News: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज महापालिकेची ऑनलाइन सर्वसाधारण सभा

Pune News: Online general meeting of PMC today on the background of Corona पुणे महापालिकेतर्फे कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी आतापर्यंत 300 कोटींच्या वर खर्च झाला आहे. त्यावर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेने जोरदार हल्लाबोल केला आहे.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना राज्य शासनाच्या आदेशानुसार आज (दि.18) दुपारी 3 वाजता महापालिकेची ऑनलाइन सर्वसाधारण सभा होणार आहे. पुणे महापालिकेतर्फे कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी आतापर्यंत 300 कोटींच्या वर खर्च झाला आहे. त्यावर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेने जोरदार हल्लाबोल केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च होत असताना कोरोनाचे संकट आटोक्यात का येत नाही? असा संतप्त सवाल भाजप वगळता विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या खर्चाची माहिती मागितली आहे. तर, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार वारंवार कोरोनाचा आढावा घेत आहेत. महत्वपूर्ण सूचनाही देत आहेत. मात्र, पुणे महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन योग्य त्या उपाययोजना करीत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी उपस्थित केला आहे.

विरोधी पक्ष कोरोनाच्या संकटामुळे भाजप विरोधात आक्रमक झाले आहेत. पुणे महापालिकेच्या यापूर्वीच्या सर्वसाधारण सभेत प्रशासन आणि सत्ताधारी विरोधात आवाज उठविला आहे. मात्र, चाणाक्ष महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे यांनी विरोधी पक्षांचे मनसुबे उधळून लावले.

मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेतही कोरोनाचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. कोरोनाचे संकटावर मात करण्यासाठी पुणेकरांनी मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायझर वापर करावा, शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन माजी उपमहापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.