Pune News : आज जाहीर होणार दहावीच्या परिक्षेचा ऑनलाइन निकाल 

एमपीसी न्यूज – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी परिक्षा 2021 चा निकाल सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार उद्या (शुक्रवारी, दि.16) दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.  अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना हा निकाल  http://result.mh-ssc.ac.in  मंडळाच्या या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल तसेच  http://www.mahahsscboard.in  या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहेत.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर अमरावती , नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत 2021 मध्ये परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

या वर्षी शासन निर्णयानुसार दहावीच्या परिक्षा रद्द केल्यामुळे शासनाच्या मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार नववीचा अंतिम निकाल आणि दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्याक्षिक यांच्या आधारे शाळांमार्फत विषयनिहाय गुण देण्यात आले आहेत.

तसेच 28 मे 2021 च्या शासन निर्णयातील तरतूदींनुसार 2021 दहावीच्या परिक्षेस श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधींमध्ये या परिक्षेची गणना करण्यात येणार नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील एक/ दोन संधी उपलब्ध राहतील असेही भोसले यांनी नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.