Pune News: पुणे महापालिकेत काम करण्यासाठी अधिकाऱ्यांची पसंती

Pune News: Preference of officers to work in Pune Municipal Corporation राज्य शासनाच्या सेवेतून महापालिकेच्या सेवेत आल्यानंतर मुख्य सभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. मागील काही वर्षांपासून मुख्यसभेची मान्यता घेण्यात येत नाही.

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत काम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. मागील काही महिन्यात पुणे महापालिकेत मुख्याधिकारी दर्जाचे (सहायक आयुक्त) तब्बल आठ अधिकारी बदलून आले आहेत. त्यांना क्षेत्रीय कार्यालयांचा पदभारही देण्यात आला आहे. महापालिकेच्या सेवा नियमावलीनुसार या पदांच्या एकूण पदांपैकी 50 टक्के पदे बढतीसाठी, 25 टक्के सरळसेवा भरतीने व 25 टक्के प्रतिनियुक्तीसाठी आहेत. या प्रमाणानुसार प्रतिनियुक्तीवर 5 ते 6 अधिकारी पुण्यात बदलून येणे अपेक्षित होते.

सेवा नियमावलीनुसार महापालिकेत सहायक आयुक्तपदाची 22 पदे आहेत. यातील सरळसेवा भरतीने 5.5, प्रतिनियुक्तीवर 5.5 व बढतीने 11 अशी पदे भरली जाणे आवश्यक आहे. राज्यशासनानेच याला मान्यता दिलेली आहे. मात्र, महापालिकेत सध्या 8 सहायक आयुक्त प्रतिनियुक्तीवर राज्यशासनाने पाठविलेले आहेत.

राज्य शासनाच्या सेवेतून महापालिकेच्या सेवेत आल्यानंतर मुख्य सभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. मागील काही वर्षांपासून मुख्यसभेची मान्यता घेण्यात येत नाही. पूर्वी महापालिकेच्या अवलोकनार्थ विषय मुख्य सभेला येत होते. गेल्या काही वर्षांपासून ही प्रथा बंद झाली आहे.

महापालिकेच्या अधिनियम 53 (1) नुसार मुख्यसभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिका-यांमध्ये वारजे क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त संतोष वारुळे, धनकवडीचे नीलेश देशमुख, औंधचे जयदीप पवार, भवानी पेठ सचिन तामखेडे, कोंढव्याचे तानाजी नरळे, सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त काटकर, भूमी जिंदगी विभागाचे सुहास जगताप, एलबीटीचे नीलेश पाटील यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.