Pune News : सार्वजनिक गणेशोत्सव यंदाही साधेपणाने!

घरगुती मूर्तींचे विसर्जन घरीच करा, महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोनाची दुसरी लाट पुणे शहरात ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सवही साधेपणाने करण्याचा निर्णय महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतलेल्या गणेशोत्सव नियोजन बैठकीत घेण्यात आला आहे. एकीकडे सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जात असताना दुसरीकडे यंदाही घरच्या गणेशमूर्तींचे विसर्जन घरीच करावे, असे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले आहे. यंदा फिरत्या हौदांची संख्या दीडशेपर्यंत वाढवणार असल्याचीही माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी आणि महापालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक महापौर मोहोळ यांनी आयोजित केली होती. त्यात गणेशोत्सवासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीला उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, आयुक्त विक्रम कुमार, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, पोलीस उपायुक्त मितेश गट्टे, सागर पाटील यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी, महापालिका अधिकारी उपस्थित होते.

बैठकीबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘समाजभान जपत यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल सर्व गणेशोत्सव मंडळांचे पुणेकरांच्या वतीने आभार मानतो. गेल्या वर्षी राज्यात सर्वात आधी आपल्या शहरानेच गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. यंदाही मंडळांनी सामाजिक भान जपले आहे. गणेशोत्सव मंडळांना परवानगी मिळवताना कोणत्याही कार्यालयात फिरावे लागू नये, यासाठी मंडळांना ऑनलाईन परवाने दिले जाणार आहेत.’

‘फिरत्या हौदांची संख्या गेल्या वर्षी 108 इतकी होती, ही संख्या यंदा 150 पर्यंत वाढवणार असून प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयनिहाय नियोजन केले जात आहे. अमोनियम कार्बोनेटची खरेदीही यंदा दुपटीने केलेली आहे’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

घरच्या बाप्पाचे करा घरीच विसर्जन : महापौर मोहोळ
‘कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी तिसऱ्या लाटेचे संकट आहेच, या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी घरीच विसर्जन करण्यास प्राधान्य द्यावे. विसर्जनासाठी लागणारे अमोनियम कार्बोनेट आपण क्षेत्रिय कार्यालयांच्या माध्यमातून पुरवणार आहोत. गेल्यावर्षी पुणेकरांनी गणेश मूर्तींचे घरीच विसर्जन करण्यास प्राध्यान दिले होते, यंदाही असाच प्रतिसाद पुणेकर देतील, हा विश्वास आहे’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.