Pune Crime News : पोलीस अधिकारी असल्याचे भासवून मैत्रिणीसह लॉजवर फुकटात राहणारा तोतया गजाआड

एमपीसी न्यूज – पोलीस अधिकारी असल्याचे भासवून मागील दोन महिन्यांपासून पुणे स्टेशन परिसरातील एका लॉजवर मैत्रिणीसोबत फुकटात राहणाऱ्या एका तोतयाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले.

गुरुवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मिलिंद उर्फ पवन हरिश्‍चंद्र सावंत (वय 37, तुकाराम नगर, डोंबिवली पू, कल्याण, ठाणे) असे त्याचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट 4 चे पोलिस कर्मचारी विमानतळ हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना पुणे स्टेशन परिसरातील एका लॉजवर बनावट पोलीस अधिकारी राहत असून तो नागरिकांना फसवत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानंतर पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर यांनी खात्री करून कारवाई करण्याचे आदेश आपल्या पथकाला दिले. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट 4 चे काही कर्मचारी पुणे स्टेशन येथील मिलन क्लोज या ठिकाणी गेले. त्यावेळी त्यांना रिसेप्शन सेंटर वर एक व्यक्ती संशयास्पद अवस्थेत उभा असलेला दिसला.

पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता “मी सुद्धा पोलीस अधिकारी आहे, तुम्हाला कळत नाही का पोलिस अधिकाऱ्याशी कसे बोलायचे, तुमची ट्रेनिंग कुठे झाली ?” असे त्यांनी पोलिसांना विचारले. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली असता पोलीस स्टेशनला विसरली असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्या या उत्तरामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी आणखी काही स्टाफ मदतीसाठी बोलावून त्याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने आपले खरे नाव सांगितले. तसेच मागील दोन महिन्यांपासून तो या लॉजवर आपल्या मैत्रिणीसह राहत असल्याचे कबूल केले.

पोलिसांनी त्याच्या खोलीची पाहणी केली असता, त्यांना आतमध्ये त्याच्या नावाच्या दोन नेमप्लेट, एक खाकी रंगाची पोलीस पॅन्ट, लाल रंगाचे दोन पोलीस बेल्ट, लाल रंगाचा पोलीस शूज, पिस्टल ठेवण्याचे होलिस्टर, कायद्याची पुस्तके आणि इतर वस्तू सापडल्या. त्याच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.