Pune News : काँग्रेस भवनात क्रांती दिन साजरा

एमपीसी न्यूज – ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

शहराध्यक्ष बागवे म्हणाले की, ‘‘8 ऑगस्टला मुंबईमध्ये झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात इंग्रजांना ‘चले जाव‘चा नारा महात्मा गांधी यांनी दिला होता. देशातील लाखो सत्याग्रहींनी आपापल्या शहरात, गावात, जिल्हात इंग्रज सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले. इंग्रज सरकारने काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली. पं. जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल यांना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आले आणि महात्मा गांधींना पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आले.

9 ऑगस्ट 1942 ला मुंबईतील गोवालिया टँक येथे अरूणा असफ अली आणि काही सत्याग्रहींनी देशाचा तिरंगा झेंडा फडकविला. पोलिसांनी सत्याग्रहींवर लाठी हल्ला आणि गोळीबार केला. काही सत्याग्रही मरण पावले आणि अरूणा असफ अली यांना पोलिसांनी अटक केली. त्याच दिवशी पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये 16 वर्षांचा तरूण नारायण दाभाडे यांनी काँग्रेस भवनमध्ये तिरंगा झेंडा फडकविला आणि ब्रिटीश सरकारने त्याच्या गोळ्या झाडल्या व ते हुतात्मा झाले. 1942 च्या ‘भारत छोडो’ आंदोलनामुळे देशाच्या स्वातंत्र्याला एक नवी दिशा मिळाली. मी या सर्व शहिदांना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करतो.’’

मोहनराव शेटे यांच्या नाट्यपथकाने हुतात्मा नारायण दाभाडे यांचे 9 ऑगस्ट 1942 साली काँग्रेस भवनमध्ये झालेल्या हत्याचे नाट्यरूंपातर सादर केले. ते नाट्य संपल्यावर उपस्थित असलेल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय, नारायण दाभाडे अमर रहे,’ अशा घोषणा दिल्या.

त्यानंतर ज्येष्ठ काँग्रेसचे नेते व माजी आमदार उल्हास पवार यांनी 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे महत्व समजावून सांगितले. ते म्हणाले की, ‘‘स्वातंत्र्य चळवळीत पुणे हे मुख्य केंद्रबिंदू होते. पुण्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. येरवडा येथील पर्णकुटी येथील ठाकरसी बंगला, आगाखान पॅलेस येथे कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांची समाधी, टिळक यांचे निवासस्थान केसरी वाडा, येरवडा कारागृहामधील महात्मा गांधी यांची खोली असे अनेक वास्तू स्वातंत्र्याच्या इतिहासाला उजाळा देणा-या आहेत.’’

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, कमल व्‍यवहारे, आबा बागुल, नीता रजपूत, नगरसेवक अजित दरेकर, लता राजगुरू, अविनाश बागवे, रफिक शेख, रमेश अय्यर, राजेंद्र शिरसाट, सोनाली मारणे, प्रविण करपे, द. स. पोळेकर, धनंजय दाभाडे, सुधीर काळे, योगेश भोकरे, अविनाश अडसुळ, डॉ. रमाकांत साठे, लतेंद्र भिंगारे, बाबा जाधव, राजेंद्र भोसले, ॲड. सुरेश बोराटे आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.