Pune News: अंत्यविधीच्या वेळी भीषण दुर्घटना; डिझेलचा भडका उडून 11 जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – पुण्यात एका मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असताना आज (शनिवारी) भीषण दुर्घटना घडली. मृतदेहावर डिझेल टाकत असताना अचानक भडका उडाल्याने अकरा जण गंभीररीत्या भाजले. पुण्यातील कैलास स्मशानभूमीत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, दीपक कांबळे नामक व्यक्तीने आज पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कैलास स्मशानभूमीत त्याचे नातेवाईक आणि आप्तजन एकत्र जमले होते. साधारण तीनशे ते चारशे लोक यावेळी एकत्र जमले होते. मृतदेहाला शेवटचा अग्नी देत असताना चितेवर डिझेल टाकण्यात येत असताना अचानक डिझेलचा भडका उडाला आणि जवळपास थांबलेल्या 11 नागरिक त्यात होरपळून निघाले. यामध्ये काही व्यक्ती गंभीररीत्या जखमी आहेत.

गंभीररीत्या भाजलेल्या व्यक्तीमध्ये, आशा प्रकाश कांबळे (वय 59), येणाबाई बाबू गाडे (वय 50), नीलेश विनोद कांबळे (वय 35), शिवाजी बाबूराव सूर्यवंशी (वय 55), वसंत बंडू कांबळे (वय 74), दिगंबर श्रीरंग पुजारी (वय 40), हरीश विठ्ठल शिंदे (वय 40), आकाश अशोक कांबळे, शशिकांत कचरू कांबळे (वय 36), अनिल बसन्ना शिंदे (वय 53), अनिल नरसिंग घटवळ यांचा समावेश आहे. तर या दुर्घटनेत माजी महापौर रजनी त्रिभुवन या थोडक्यात बचावल्या.

ही दुर्घटना घडली त्या वेळी माजी महापौर रजनी त्रिभुवन या देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या. आगीत भाजलेल्या का व्यक्तीने रजनी कवडे यांच्या साडीचा आधार घेतल्याने त्या देखील यामध्ये काही प्रमाणात जखमी झाल्या. संध्याकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.