IPL Cricket News :  गुजरातचा विजय रथ रोखण्यात बंगलोरलाही रॉयल अपयश

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – अविश्वसनीय विजय मिळवण्याची क्षमता, संपूर्णपणे विजयी सांघिक कामगिरी, चपळ क्षेत्ररक्षण अशा सर्व गोष्टींचा सुंदर मिलाफ झाल्यामुळे पदार्पणातच आयपीएल स्पर्धेत सर्वांना प्रभावित करणाऱ्या गुजरात टायटनने आजही आपली विजयी कामगिरी अभेद्य ठेवत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सहा गडी राखून पराभव केला.

टाटा आयपीएल 2022 मधला आजचा 43 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन या संघात झाला, ज्यात बंगलोर संघाचा कर्णधार डूप्लेसीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, आणि आपल्या निर्धारित 20 षटकात 170 धावा जमवून हा निर्णय योग्य असल्याचेही सिद्ध केले.

खरे तर बंगलोर संघाच्या डावाची सुरुवात अतिशय खळबळजनक झाली, कर्णधार डूप्लेसी भोपळाही न फोडता संगवानच्या गोलंदाजीवर विकेटकिपर साहाच्या हातात झेल देवून बाद झाला, आणि बंगलोर संघाला मोठा धक्का बसला, पण अखेर या धक्क्यातून संघाला सावरले ते विराट कोहली आणि रजत पाटीदार या जोडीने.

आताशा कोहलीच्या कमी धावात बाद होण्याची क्रिकेटरसिकांना कितीही आवडत नसले तरी सवय झाली आहे, तो ही ब्रेक न घेता (हा सल्ला त्याला त्याच्या आवडत्या कोचनेच दिला आहे) खेळतो, त्याचे हल्ली मिथुन चक्रवर्तीच्या अखेरच्या टप्प्यावर असलेल्या नव्या चित्रपटासारखे व्हायला लागले आहे.  निर्मात्याला वाटायचे दादाचा हा चित्रपट तरी आपल्याला पैसे वसूल मिळवून देईल, पण कसले काय चित्रपट पहिल्याच आठवड्यात डब्ब्यात, तसेच कोहलीचेही व्हायला लागले आहे.

आणखी एक इंनिंग आणि त्यात तरी त्याची मोठी (शतक) खेळी होईल असे वाटत असते आणि हाय रे दैवा, सगळ्या अपेक्षा कचऱ्यात, तसे तो निराश करत आणि होत बाद होतो. आज मात्र त्याची बॅट बोलली आणि त्याला दुसऱ्या बाजूने रजत पाटीदारनेही चांगली साथ दिली. या जोडीने बघता-बघता दुसऱ्या गड्यासाठी तब्बल 99 धावांची भागीदारी करून चांगलाच डाव सावरला.

दोघेही उत्तम खेळत होते, कोहली चांगलाच भरात आलेला होता, आणि त्याच्या बॅटला लागलेले ग्रहण आज सुटणार असे वाटत असतानाच पाटीदार आपले अर्धशतक पूर्ण करुन संगवानच्या गोलंदाजीवर 52 धावा काढून बाद झाला. हे त्याचे पहिलेच आयपीएल अर्धशतक ठरले. त्याने केवळ 32 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकात मारत या धावा काढल्या आणि कोहलीला उत्तम साथ दिली.

तो बाद झाल्यानंतर कोहलीही आपले 43वे आयपीएल अर्धंशतक पूर्ण करून शमीच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला. कोहलीने 53 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार मारत  58 धावा केल्या. या अर्धशतकी खेळीने या महान क्रिकेटपटूचा गेलेला फॉर्म वापस येवो, इतकीच अपेक्षा, कारण कोहलीकडून अनेक विक्रमाची अपेक्षा तुम्ही आम्ही नाही तर साक्षात सचिन तेंडूलकरने केली आहे. त्या सर्व आशा-आकांक्षा फलद्रूप होवोत, आणि त्याच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले जावोत, हीच एक क्रिकेटरसिक म्हणून अपेक्षा.

पाटीदार आणि कोहलीने दिलेल्या या चांगल्या सुरूवातीचा फायदा ग्लेनने मॅक्सिमम वेल उचलून संघाला मधल्या फळीतल्या खेळाडूंना सोबत घेवून अचूक उचलला, आणि बंगलोर संघाने गुजरात पुढे 171 धावांचे रॉयल चॅलेंज उभे केले. मॅक्सवेलने आपल्या चिरपरिचित शैलीत तडाखेबंद 33 धावा केल्या तर महिपाल लोमरारनेही अखेरच्या षटकात हाणामारी करत 16 धावांचे वेगवान योगदान दिले, ज्यामुळे बंगलोरच्या नावावर 6 बाद 170 अशी सन्मानजनक धावसंख्या लागली.

गुजरात संघाचे मागील सामन्यातले विजयी सातत्य बघता 120 चेंडूत 171 धावा हे लक्ष्य फारसे कठीण वाटले नव्हतेच, त्यातच वृद्धीमान साहा आणि शुभमन गीलने जबरदस्त सुरुवात करून दिली, या जोडीने फक्त 42 चेंडूत नाबाद अर्धशतकी सलामी देत संघाचा आत्मविश्वास किती बुलंद आहे याचीच प्रचीती दिली. मात्र हसरंगाने आपल्या पहिल्याच षटकात साहाला बाद करून ही जोडी फोडली आणि आपल्या संघाला पहिले यश मिळवून दिले.

साहाने 22 चेंडूत 4 चौकार मारत 29 धावा काढल्या. त्याच्या जागी आला तो आणखी एक युवा फलंदाज साई सुदर्शन. त्याच्या साथीने पुढे खेळताना फक्त 17 धावांची भागीदारी झालेली असताना शुभमन गील सुद्धा जम बसल्यानंतर पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आणि शाहबाज अहमदला आपली विकेट देवून बसला. गीलने 28 चेंडूत 31 धावा काढल्या, यावेळी गुजरात संघाची धावसंख्या 9 व्या षटकाच्या अखेरीस 2 बाद 68 अशी होती.

यानंतर थोड्याच वेळात हार्दिक पंड्या आणि साई सुदर्शनही फारसे योगदान न देता बाद झाले आणि गुजरात संघ 13 व्या षटकाअखेरीस 4 बाद 95 अशा परिस्थितीत आला, तरीही कोणालाही गुजरात संघ पराभूत होईल, अशी शंकाही भेडसावत नव्हती कारण यावेळी मैदानावर होते किलर मिलर आणि मागच्या सामन्यातल्या विजयाचा शिल्पकार राहुल तेवतीया. आणि या जोडीने त्या सर्व अपेक्षा जराही अवास्तव नाहीत हे सिद्ध करताना 43 चेंडूत 79 धावांची नाबाद भागीदारी करत गुजरात संघाला ‘रोना मुश्कीलही नही, नामुमकीन है’ असाच जणू संदेश देत आपल्या विजयी अभियानाला दिमाखात चालू ठेवले.

राहुल तेवतीयाने पुन्हा एकदा आपले महत्व सिद्ध करत फक्त नाबाद 43 धावा करताना 5 चौकार आणि दोन षटकार मारले तर मिलरनेही त्याला योग्य साथ देत 24 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या. गुजरात टायटनचा हा सातवा विजय आहे.

संक्षिप्त धावफलक

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – 6 बाद 170
कोहली 58, पाटीदार 52, मॅक्सवेल 33, लोमरार 16
प्रदीप सांगवान 19/2, रशीद खान 29/1, शमी 39/1
पराभूत विरुद्ध
गुजरात टायटन – 4 बाद 174
साहा 29, गील 31, सुदर्शन 20, तेवतीया नाबाद 43, मिलर नाबाद 39
हसरंगा 28/2, शाजबाज 26/2

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.