Pune News : नाटकाचा पडदा उघडण्यासाठी कलाकारांचे नटराजाकडे साकडे

एमपीसीन्यूज : दरवर्षी दिमाखात उत्साहात साजरा करण्यात येणारा बालगंधर्व रंगमंदिराचा 54 वा वर्धापनदिन सोहळा यंदाच्या वर्षी साधेपणाने साजरा झाला. यावेळी बालगंधर्व रंग मंदिराचा पडदा उघडून त्याचे पुजन करण्यात आले. तिथे रीतसर श्रीफळ वाढविण्यात आला व दीपप्रज्वलन करण्यात आले. हा पडदा लवकरच उघडावा, यासाठी सर्वांनी नाटराजकडे साकडे घातले.

कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूमुळे सर्व परिस्थिती लक्षात घेऊन व शासनाच्या आदेशानुसार व सर्व नियमांचे पालन करून हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

पुण्याच्या उपमहापौर सुनीता वाडेकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, जेष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर, जेष्ठ अभिनेत्री रजनी भट, अभिनेते विजय पटवर्धन, बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक सुनील मते,निर्माते दत्ता दळवी, शशी कोठावळे, सुमित कॅसेटचे सुभाष परदेशी, कलाकेंद्राचे अशोक जाधव, अण्णा गुंजाळ, सुनील महाजन, जतीन पांडे, प्रकाश पायगुडे, योगेश देशमुख, योगेश सुपेकर यांच्यासह नाट्य चित्रपट परिवारातील मोजकेच पदाधिकारी व सदस्य एकत्र येऊन 54 वा वर्धापनदिन प्रतिमेस पुष्प अर्पण करून व केक कापून प्रातिनिधिक स्वरूपात संपन्न झाला.

कलाकारांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवू व कलाकारांसाठी रंगमंच कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी दिले.

मेघराज राजेभोसले म्हणाले, महानगरपालिकेच्या अखत्यारीतील रिकामे गाळे गरजू कलाकारांना नाममात्र शुल्कात भाडे तत्वावर देण्यात यावेत, तसेच कलाकारांना शहरी गरीब योजनेचा थेट लाभ मिळावा. छोटेखाणी स्वरुपात पालिकेच्या हद्दीत सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.