Pune News :पुण्याविषयी माहिती सांगणाऱ्या ‘पुण्यकथा’ पुस्तकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज: आदिमानवाच्या इतिहासापासून ते पुण्यातील निसर्ग वैभव, संग्रहालय, पर्यावरण, पर्यटन आदी विषयांच्या माध्यमातून पुण्याचा धावता आढावा मांडणाऱ्या ‘पुण्यकथा- पुण्याचा शेकडो वर्षाचा इतिहास’ सांगणाऱ्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन डेक्कन कॉलेजचे माजी कुलपती डॉ.गो.बं.देगलूरकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करण्यात आले.

हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यकारी संचालक मंजिरी खांडेकर यांच्या संकल्पनेतून या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी यांनीही पुस्तकाला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवींद्रसिंह परदेशी, मंजिरी खांडेकर, लेखिका कल्याणी सरदेसाई, हेरिटेज इंडिया टीमचे प्रा. प्र.के.घाणेकर, डॉ. अजित आपटे, डॉ. मंजिरी भालेराव, तेजस मोडक, सनील गोकर्ण आदी मान्यवर उपस्थित होते.

मागील ३०० वर्षात संपूर्ण भारतात पुण्याला अग्रस्थान आहे, असे इतिहास सांगतो. पुण्यात आपल्याला माहीतही नाही इतकी मोठी माणसं होऊन गेली आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून पुण्याचा हा इतिहास समोर आणण्याचा हा एक प्रयत्न आहे.- डॉ. गो.बं.देगलूरकर, माजी कुलपती, डेक्कन कॉलेज

आपण ज्या भागात वाढलो त्या भागाची जडणघडण कशी झाली याची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. पुण्यातील अनेक जुन्या शैक्षणिक संस्थांनी राष्ट्रीय शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आहे. या पुस्तकामुळे पुण्याबाहेरच्या तसेच पुण्यातल्या अनेकांना पुण्याची वेगळी ओळख होणार आहे.- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.