Pune News: गणेश विसर्जनासाठीच्या महापौरांच्या अजून नव्या कल्पक योजनांची वाट पाहा – आबा बागूल

एमपीसी न्यूज – यंदा गणेशोत्सवावर कोरोना विषाणूचे संकट असल्यामुळे पुण्याच्या महापौरांनी सार्वजनिक व घरगुती श्री गणेशाच्या विसर्जनासाठी नवनवीन योजना मांडल्या. नदी अथवा कॅनॉलमध्ये विसर्जन केल्याने प्रदूषण होते हे लक्षात घेऊन सुमारे 10-12 वर्षांपूर्वी प्रत्येक क्षेत्रीय  कार्यालयांतर्गत विविध भागात हौद उभारून त्यात श्रींचे विसर्जन कारण्याची व्यवस्था केली गेली होती. मात्र आता हे हौद असणार नाहीत, तर ‘कल्पक’ महापौरांनी बादलीत  श्रींचे विसर्जन करण्याची नामी योजना जाहीर केली. त्यासाठी महानगरपालिकेतर्फे लिक्विड  देणार असल्याचीही घोषणा केली. आता त्यातील अव्यवहार्यता  लक्षात आल्यावर ‘कल्पक’ महापौरांनी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात विसर्जनासाठी फिरते हौद  ही  नवी कल्पना जाहीर केली आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या निर्णयावर हल्लाबोल केला. 

_MPC_DIR_MPU_II

पुण्याच्या ‘कल्पक’ महापौरांच्या या भन्नाट कल्पनांनी श्रद्धाळू पुणेकर मात्र संभ्रमात पडले आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात फिरते हौद ठेवले. ज्या  ठिकाणी असे हौद असतील तेथे गर्दी होणार नाही काय? दीड दिवस,पाच दिवस,सात दिवस,आणि दहा दिवस या प्रत्येक विसर्जनाच्या दिवशी हे हौद उपलब्ध असणार काय?  विसर्जनापूर्वी श्रींची आरती करण्याची प्रथा आहे. ती आरती करण्यासाठी  अश्या ठिकाणी मान्यता मिळेल काय? अशा हौदात विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी रांगा लावायच्या काय? अशा रांगांमध्ये सहा फुटांचे अंतर राखण्याची व्यवस्था केली आहे काय? पुण्यात सुमारे 4 लाख घरगुती गणपती बसतात. त्यासाठी 15 फिरते हौद पुरेसे ठरणार आहेत काय? तिथे होणाऱ्या गर्दीमुळे ट्राफिक जॅम होणार यासाठी  ‘कल्पक’ महापौरांनी उपाययोजना केली आहे काय? जर विसर्जन सुरु झाल्यानंतर तो हौद भरला तर तो फिरता हौद नेऊन कोठे रिकामा करणार? असे अनेक संतप्त सवाल बागूल यांनी उपस्थित केले आहेत.

त्या जागी नवा फिरत हौद येईपर्यंत विसर्जनासाठी आलेल्या श्रद्धाळू भाविकांनी हातात मूर्ती घेऊन तिस्टत उभे राहायचे काय? याउपर नदी अथवा कॅनॉल येथे भाविक श्रींच्या विसर्जनासाठी आले तर त्यांना विसर्जनास अटकाव करणार का, हे आणि असे अनंत प्रश्न श्रद्धाळू पुणेकर विचारत आहेत, असे बागूल यांनी म्हटले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये. यासाठी महापौर प्रयत्न करीत आहेत. त्याचे पुणेकरांनी कौतुकही केले आहेत. परंतु  पुणेकरांना वरील प्रश्नांनी भंडावून सोडले आहे. पुणेकरांना माझी एवढीच विनंती की , आजून थोडे थांबा आपले  ‘कल्पक’ महापौर श्रींच्या विसर्जनासाठी अजून काही अदभूत कल्पना मांडतील. त्याची वाट पहा. असे  ‘कल्पक’महापौर महाराष्ट्रात कोठेही नाहीत. ते पुण्याला लाभले आहे. हे पुणेकरांचे भाग्य समजा आणि त्यांच्या नवनवीन  कल्पनांची वाट पाहा ‘सुज्ञास अधिक सांगणे न लगे’, असा शेराही बागूल यांनी मारला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.