Pune News: Pmpml सुरू झाल्याने सर्वसामान्य पुणेकरांची सोय झाली- शंकर पवार

पुणेकरांनीही आवश्यक गरजेचा प्रवास करण्यासाठी खासगी वाहनांचा वापर न करता पीएमपीएमएलचा प्रवास करावा, अशा शुभेच्छाही शंकर पवार यांनी दिल्या.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटामुळे मागील 5-6 महिन्यांपासून पीएमपीएमएल बंद करण्यात आली होती. त्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांचे प्रचंड हाल झाले. आज ही बससेवा सुरू झाल्याने नागरिकांची सोय झाली, अशी प्रतिक्रिया पीएमपीएमएलचे संचालक शंकर पवार यांनी दिली.

पीएमपीएमएलचे रोजचे उत्पन्न दीड ते पावणे दोन कोटी रुपये आहे. ते कोरोनाच्या काळात केवळ 2 लाखांवर आले आहे. महापौर मुरलीधर मोहोळ, व्यवस्थापकीय, संचालक राजेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात बालगंधर्व, डेक्कन, पुणे मनपा असा बसमध्ये प्रवास करून चांगला संदेश देण्यात येणार आहे.

बससेवा बंद असल्याने कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. बससेवा सुरू करण्यासाठी सातत्याने आपण पाठपुरावा केला आहे. 25 टक्के बससेवा सुरू झाल्याने पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे.

सध्या विविध मार्गावर 425 बसेस धावणार आहेत. पुणेकरांनीही आवश्यक गरजेचा प्रवास करण्यासाठी खासगी वाहनांचा वापर न करता पीएमपीएमएलचा प्रवास करावा, अशा शुभेच्छाही शंकर पवार यांनी दिल्या. तर, पीएमपीएमएलची सेवा सुरू केल्याने रोजंदारी सेवकांना काम मिळणार आहे.

बससेवा बंद असल्याने मागील 5 ते 6 महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना काम नव्हते. त्यांचे अत्यंत हाल होत होते. ही बससेवा सुरू करण्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा केला. त्याला अखेर आज यश आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांच्या सोयीसाठी पीएमपीएमएल सुरू करण्याचे आदेश दिले, अशी माहिती पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी दिली.

पीएमपीएमएलची सेवा सुरू केल्यासने आपण पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांचे आभार मानत असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.