Pune : तुळशीबाग राम मंदिरात सजली सुखानुभूती देणारी अभिषेकी बुवांची स्वर मैफील

एमपीसी न्यूज – सर्वात्मका सर्वेश्वरा…नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी… यांसारख्या पं. जितेंद्र अभिषेकी (Pune) यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचे सादरीकरण पं. शौनक अभिषेकी यांनी करताच पुणेकरांनी भरभरून दाद दिली. ऐतिहासिक तुळशीबाग राम आयोजित स्वर मैफलीत समर्थ रामदास स्वामी यांचा अभंग असलेली ‘ध्यान करू जाता मन हरपले…’ या रचनेच्या सादरीकरणाने रसिकांच्या  मनाचा ठाव घेतला. श्रीराम नवमी उत्सवाच्या निमित्ताने भाव-भक्तिगीतांनी सुखानुभूती देणारी अभिषेकी बुवांची मैफल सजली.

श्री रामजी संस्थान तुळशीबागेच्या वतीने मंदिरात प्रख्यात गायक पं. शौनक अभिषेकी यांच्या सुश्राव्य गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त राघवेंद्र उर्फ सुहास तुळशीबागवाले, विश्वस्त भरत तुळशीबागवाले, डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन 1761 साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामध्ये यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत 263 वे वर्ष साजरे होत आहे.

पं. शौनक अभिषेकी यांनी स्वरमैफलीचा प्रारंभ रागदारी ने केला. पं. जितेंद्र अभिषेकी यांची रचना राग अभोगी मध्य लय झपतालामध्ये ख्याल आणि द्रुत एकतालातील बंदिश सादर केली. त्यानंतर नाथ संप्रदायातील संत बाबा गोरक्षनाथ यांचे ‘गुरुजी’ हे नाथपंथीय भजन सादर होताच वातावरण भक्तीमय झाले. श्रीरामनवमी उत्सवात गायिका गौरी पाठारे यांचा देखील गायनाचा कार्यक्रम झाला.

Pimpri : प्रबोधन पर्वात वैचारिक गीतांची संगीतमय मैफिल

9 ते 23 एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी 5.15 वाजता प्रवचनकार मोहना चितळे यांचे प्रवचन सुरु आहे. तसेच मंदिरात श्री कौसल्या माता डोहाळजेवण, श्रीरामजन्म सोहळा, श्रीरामराज्याभिषेक सोहळा अशा धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रामायण वाचन, सांगितीक कार्यक्रम अशा कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.