Pune: महामेट्रो मल्टी मॉडेल हबच्या वार्षिक नफ्यातून महापालिकेला ४०-५० टक्के हिस्सा मिळावा- आबा बागूल

महानगरपालिकेने महामेट्रोला दिलेल्या क्षेत्राचे ताबे पावती केलेली आहे. परंतु, करारनामा झालेला नाही.

एमपीसी न्यूज – महामेट्रोला पुणे महानगरपालिकेने दिलेल्या जागेवर मल्टी मॉडेल हबमधून होणाऱ्या वार्षिक नफ्यातून 40-50 टक्के हिस्सा मिळावा, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी आयुक्तांकडे केली आहे.

पुणे पेठ पर्वती स्कीम क्रमांक 3 फायनल प्लॉट क्रमांक 499 व 500 अ स्वारगेट येथील 28 हजार चौ. मीटर एवढ्या क्षेत्रात महामेट्रोला (महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड) मेट्रो स्टेशन करण्यासाठी रेडीरेकनर दराने महानगरपालिकेने जागा दिली आहे.

सार्वजनिक हितासाठी जागा देताना रेडीरेकनर दराने जागा देणे योग्य आहे. परंतु, मेट्रो स्टेशन उभारत असताना येथे मल्टी मॉडेल हब व्यावसायिक संकुल देखील महामेट्रो करत आहे.

या जागेचा वापर महामेट्रोने मेट्रो स्टेशन व्यतिरिक्त मल्टी मॉडेल हब व्यावसायिक संकुल करून नफा मिळवत असेल तर यातून होणाऱ्या वार्षिक उत्पन्नातून 40-50 टक्के हिस्सा महामेट्रोने पुणे महानगरपालिकेला देणे बंदनकारक केले पाहिजे.

पुणे शहरात अनेक जागा मेट्रो स्टेशनसाठी देण्यात आल्या आहेत. त्यापैकी तीन ठिकाणी मोक्याच्या जागेत महामेट्रोचा मल्टी मॉडेल हब व्यावसायिक संकुल उभारण्याचा विचार आहे. यासर्व ठिकाणच्या व्यावसायिक संकुल मधून येणाऱ्या उत्पन्नाच्या 40-50 टक्के हिस्सा महानगरपालिकेला मिळावा.

महानगरपालिकेने महामेट्रोला दिलेल्या क्षेत्राचे ताबे पावती केलेली आहे. परंतु, करारनामा झालेला नाही. करारनामा करताना या जागेचा व्यावसायिक हेतूने वापर केल्यास पुणे महानगरपालिकेला होणाऱ्या वार्षिक नफ्यातून 40-50 टक्के हिस्सा मिळावा अशी अट घालण्यात यावी किंवा 40-50 टक्के भागीदारी करावी व स्थायी समिती मार्फत मुख्य सभेत मान्यता घेऊनच करार करावा.

महानगरपालिका सार्वजनिक हिताच्या वापरासाठी महामेट्रोला हिस्यापोटी 950 कोटी रुपये देणार आहे. त्यापैकी काही पैशाच्या स्वरूपात व उर्वरित जागेच्या स्वरूपात वळती करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.