Pune Politics : वेळप्रसंगी पुण्याच्या पालकमंत्रिपदी नको दोन्ही ‘दादा’, करा आम्हास वादा!

भाजप कार्यकर्त्यांचे पक्षश्रेष्ठींना साकडे

एमपीसी न्यूज (गोविंद घोळवे) – पुणे जिल्हा पालकमंत्रिपदी वेळप्रसंगी चंद्रकांतदादा यांना (Pune Politics) बदला परंतु अजितदादा नको, असा सूर भारतीय जनता पक्षात आळविला जात आहे. त्यामुळे ‘त्रिशूळ’ सरकारमध्ये ‘तीन तिघाड, काम बिघाड’, असा प्रकार पालकमंत्रिपदावरून सध्या सुरू आहे. त्यामुळे अजितदादा गट आणि भाजपातील एक गट अस्वस्थ आहे.

गतिमान सरकार, शासन आपल्या दारी आणि कार्यकर्ते फिरतात घरोघरी, मात्र नेमकं सरकारमध्ये काय चालले आहे, हे कोणालाच कळेना. कार्यकर्त्यांना एखादे महामंडळ अद्याप मिळेना, त्यामुळे त्रिशूळ सरकारमधील तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. सध्या तरी आमच्या हातात जे जे होईल, ते ते पाहात राहावे, चित्ती असावे समाधान, असे म्हणण्याची वेळ आली आहे, अशी भावना व्यक्त करीत आहेत.

शरद पवार यांच्या पक्षाला उभे खिंडार पाडून अमित शहा यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धडा शिकविला आहे, मात्र सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार सरकार चालविताना भाजप पक्षश्रेष्ठींना विचारत नसल्यामुळे भाजपातील खासदार, आमदार तसेच निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

अजितदादा पवार नको म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले तर (Pune Politics) भाजपने थेट पुन्हा अजितदादा पवार यांच्या हाती तिजोरीच्या चाव्या दिल्यामुळे शिंदे गटात प्रचंड नाराजी आहे. मात्र सध्या आमदार, खासदार यांच्याबरोबर तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी झाली आहे.

पुणे, पिंपरी शहरांत भाजपची ताकद फार मोठी असून आमदार, खासदार आणि शेकडो नगरसेवक तसेच दोन्ही महानगरपालिकांवर पक्षाची एकहाती सत्ता असल्याने कोणत्याही परिस्थितीत पुणे जिल्ह्याला पालकमंत्री अजितदादा नको, वेळप्रसंगी चंद्रकांतदादा देखील नको, असा सूर भाजप पक्षश्रेष्ठींपुढे आळविला जात आहे., मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लवकरच घेणार आहेत.

अजितदादा पवार यांना पुणे जिल्ह्याच्या ऐवजी कोल्हापूर द्या, सातारा दिला तरी वावगे नको, अशी चर्चा भाजपात सुरू झाल्याने पुन्हा एकदा पालकमंत्रिपदावरून तिन्ही पक्षात अंतर्गत प्रचंड मतभेद निर्माण झाले आहेत.

दोन्ही ‘दादां’च्या वादात भारी पडणार ‘देवेंद्र भाऊ’

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पुन्हा भाजपची एकतर्फी सत्ता आणायची असेल तर एकवेळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्हा पालकमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळावी, अशी जोरदार चर्चा पक्षात सुरू आहे. त्यामुळे आता नेमकी कोणाची वर्णी लागणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात मोठा प्रभाव पाडण्यात अद्याप म्हणावे तसे यश आले नसून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या पक्षाला जास्त जागा देखील मिळणार नाहीत. त्यामुळे शिंदे गटात नाराजी, अजितदादा यांचा निर्णय होत नाही म्हणून दादा गट नाराज तर आपल्यापेक्षा दोघे वरचढ होता कामा नये यासाठी भाजपची मोर्चेबांधणी यामुळे पुणे शहरासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पालकमंत्रिपदावरून प्रचंड रस्सीखेच सुरू आहे.

नाशिक छगन भुजबळ यांनाच हवे आहे म्हणून गिरीश महाजन नाराज, पुणे अजितदादांना दिले तर चंद्रकांतदादा नाराज आणि रायगड अदिती तटकरे यांना दिले तर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले नाराज असा तिढा निर्माण झाल्याने पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये सध्या तरी तीन तिघाड काम बिघाड (Pune Politics) असा प्रकार जोरात सुरू आहे.

राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदी शिंदे आणि उपमुख्यमंत्रिपदी अजितदादा पवार आल्याने भाजपमधील जुनी-जाणती मंडळी नाराज आहेतच. त्यामध्ये मधूनमधून काँग्रेसही फुटणार अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. यामुळे तर भाजपमधील कार्यकर्त्यांवर ‘जय श्रीराम , आमच्या हाताला द्या काही तरी काम’, असे म्हणायची वेळ आली आहे. त्यामुळे ‘सरकार गतिमान’ परंतु आम्हा कार्यकर्त्यांना मिळत नाही मान, अशी तक्रार तिन्ही पक्षातील कार्यकर्ते खासगीत बोलताना करीत आहेत.

पुणे जिल्हा पालकमंत्रिपदी अजितदादा पवार यांची वर्णी लागली नाही तर पुन्हा एकदा तिघाडी सरकारमध्ये काही राजकीय बिघाडी होणार का, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होऊ शकते, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही., कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांच्या मनात काय आहे, कोणालाच सांगता येत नाही.


– गोविंद घोळवे
राजकीय सल्लागार संपादक
एमपीसी न्यूज

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.