Pune : राम मंदिर भूमिपूजनामुळे जनतेमध्ये आत्मविश्वास वाढणार : गोविंदगिरी महाराज

Ram Mandir Bhumi Pujan will increase confidence among the people: Govindgiri Maharaj :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले पाहिजे

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकट काळात राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमामुळे जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण होणार असल्याचे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अयोध्येत भव्य दिव्य असे राम मंदिर उभारले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातील 150  जणांना निमंत्रण दिलं जाणार आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेकवेळा भूमिका मांडली आहे. त्यांचे कार्य यामध्ये खूप मोठे आहे. त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले पाहिजे.

राम मंदिराची उभारणी गुजरातमधील सोनपुरा कुटुंब करणार आहे. याच कुटुंबाने प्रसिद्ध सोमनाथचं मंदिर, अंबाजींचं मंदिर बांधलं आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या स्वामीनारायण मंदिराची उभारणीही त्यांनी केली आहे.

लार्सन अँड टुब्रो (एलअँडटी) कंपनी त्यांच्यासोबत सहकार्य करुन या मंदिराची उभारणी करणार आहे.

राम मंदिराची उंची ठरल्याप्रमाणे 161 फूट असेल. दोन मजल्यांच्यावर मंदिराचा शिखर असेल. संसद भवन ज्या प्रकारे एका उंच पायावर उभारण्यात आली आहे तशाच पद्धतीने उंच पाया घेऊन त्यावर 161 फूट उंच मंदिराचे बांधकाम होणार आहे.

अशोक सिंघल यांच्या उपस्थितीत सर्व चर्चा करुन सर्व प्रमुख संतांनी मिळून जो आराखडा ठरवला होता. तेच प्रारुप आबाधित ठेवलं आहे, त्यात शक्य तेवढी भव्यता आणावी यासाठी त्यात 20 फूट उंची वाढवून एक मजला वाढवण्यात आला आहे.

तसेच अधिक तीन शिखरं करण्याची योजना होती ती आता पाच शिखरांची झाली आहे, असेही गोविंदगिरी महाराज म्हणाले.

राम मंदिराच्या भूमिपूजनाला पंतप्रधान मोदी जाणार असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. त्याला गोविंदगिरी महाराजांनी उत्तर दिले.

कोरोनाच्या संकट काळात मोदी हे चांगले काम करीत आहेत. काही लोकांना मोदी यांचे नावच घेणे आवडत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.