Pune Rural Crime News : दोन सराईत दरोडेखोरांना ‘एलसीबी’कडून अटक

एमपीसीन्यूज : स्थानिक गुन्हे शाखा आणि वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोन अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या असून, या सराईत दरोडेखोरांकडून वडगाव निंबाळकर येथील दरोडा, घरफोडी, जबरी चोरी तसेच काटी ( ता. इंदापूर) येथील दरोडा असे, एकूण 4 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.

विकास किरण शिंदे (वय 25, रा. नांदल, ता. फलटण, जि. सातारा) आणि रावश्या कोब्या काळे (वय 25, रा. काटी, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

इंदापूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात आरोपींनी दरोडा टाकताना दरवाज्यावर दगड टाकून घरात प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादी महिला आणि घरात असलेली लहान मुलगी यांना कोयत्याचा धाक दाखवून घरातील सोन्या -चांदीचे दागिने आणि 1 मोबाईल, असा एकूण 1 लाख 7 हजार रु किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.

तसेच वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील गुन्ह्यात देखील आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून सोन्या -चांदीचे दागिने 2 मोबाईल, असा एकूण 2 लाख 16 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. या व अन्य गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेतली.

दरम्यान, पोलिसांनी गोपनीय माहितीवरून विकास शिंदे व रावश्या काळे या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी आरोपींनी वरील दरोडे व घरफोड्या आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने घातल्याची कबुली पोलिसांना दिली.

या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. त्यांच्या इतर आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू आहे.

पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदशनखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उप निरीक्षक शिवाजी ननवरे, हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे,  पोलीस नाईक राजू मोमिन, विजय कांचन, अभिजित एकशिंगे, कॉन्स्टेबल, धिरज जाधव तसेच वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोमनाथ लांडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.