Pune : श्री संताजी प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री निधीला 51 हजार रुपयांचा धनादेश

एमपीसी न्यूज : श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूड यांच्यावतीने समस्त तेली समाजाच्या सहकार्याने कोविड – 19 च्या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री निधीला 51 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.

श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूडतर्फे पुणे महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते व नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांच्याकडे मुख्यमंत्री निधीला देण्यासाठी 51 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश भोज, उपाध्यक्ष सूर्यकांत मेढेकर, रविंद उबाळे, कायदेशीर सल्लागार ऍड. गोरख किरवे, भगवान खंदारे, विठ्ठल किर्वे, किरण किर्वे, अशोक तांबे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ही संस्था गेल्या 3 वर्षांपासून तेली समाजाच्या सहकार्याने अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते. त्यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वधू – वर मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आजपर्यंत प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत श्री संताजी प्रतिष्ठानने आपले सामाजिक कर्तव्य जपण्याचा वेळो – वेळी प्रयत्न केला आहे.

दरम्यान, पुणे महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते व नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या माध्यमातून आणि श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान (ट्रस्ट) यांच्या सहकार्याने अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. सध्या कोरोना विषाणूमुळे संकटग्रस्त व अडचणीत असलेल्या कोथरूड परिसरातील प्रभाग क्र. १२ मधील विविध भागातील विधवा महिला भगिनी, दिव्यांग , गरजू व गरीब अशा कुटुंबांना अन्न – धान्याचे वाटप करण्यात आले.

श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान (ट्रस्ट) तर्फे रोज अशा गेल्या पंचवीस दिवसांपासून रोज १०० गरीब कुटुंबांना अन्न – धान्यवाटप कोथरूडच्या विविध परिसरात करण्यात येत आहे. आज पर्यंत २४५० कुटुंबियांना मदत पोहचवली आहे. अशा रोज १०० गरजू कुंटुंबाना मदत करण्याचा संकल्प आहे. या अन्न – धान्यासाठी श्रीपाद पोफळे, जुनेद अन्सारी, शोएब अन्सारी,पंजाब नैशनल बँक, पौड रोड या समाजातील दानशूर व्यक्तींनी व संस्थांनी मदत केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.