Pune: कारगील योद्धे आणि कोरोना योद्धे यांच्यात साम्य- चंद्रकांत पाटील

कोरोनाची लढाई ही वेगळी आहे. इथं शत्रू दिसत नाही, पण तरीही हल्ले होत असतात. त्यामुळेच या लढाईत जास्त सतर्क राहावे लागते. कोरोना योद्धांमुळे कोरोना विरोधातील लढाई लढता येत आहे.

एमपीसी न्यूज- कारगील युद्धात विजय मिळावा यासाठी शत्रूशी प्राणपणानं आपले सैनिक लढले. या योद्ध्यांचे स्मरण करण्यासाठीच कारगील विजय दिवस आपण साजरा करतो. कोरोना विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी कोरोना योद्धे प्राणपणानं लढत आहेत. देशासाठी, समाजासाठी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता लढत राहणे, हेच कारगील आणि कोरोना योद्धा यांच्यातले साम्य आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.

सरहद संस्थेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या निमित्तानं तसेच कारगील विजय दिवसाला 26 जुलै 2020 रोजी 21 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं कोरोनाशी प्राणपणानं संघर्ष करणाऱ्या आणि हजारोंचे प्राण वाचवणाऱ्या पुणे शहरातल्या कोरोना योद्ध्यांना कारगिल गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.

सरहद संस्थेत मर्यादित लोकांच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भाजपचे प्रदेश सचिव राजेश पांडे, सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, कारगील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे संयोजक संजीव शहा, निखिल शहा, वंदे मातरम संघटनेचे प्रदेश अध्यक्ष वैभव वाघ, सरहद संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात वंदे मातरम् संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन जामगे, भवानी पेठेतल्या होप हॉस्पिटलचे डॉ. अमोल देवळेकर, डॉ. दीपा वळेकर यांना कारगिल गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आले. तसेच लॉकडाऊन काळात 500 लोकांचे प्राण वाचवण्यास कारणीभूत ठरलेल्या 108 आपत्कालीन ॲम्ब्युलन्स सेवेचे चालक तेजस कराळे, सुशील कराळे आणि विकास काजळे यांचा ‘कारगिल विशेष सन्मान’ देऊन गौरवण्यात आले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘कोरोनाची लढाई ही वेगळी आहे. इथं शत्रू दिसत नाही, पण तरीही हल्ले होत असतात. त्यामुळेच या लढाईत जास्त सतर्क राहावे लागते. कोरोना योद्धांमुळे कोरोना विरोधातील लढाई लढता येत आहे. त्यांचा योग्य तो सन्मान होणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कारगील विजय दिवसाचे औचित्यही उचित आहे.

सचिन जामगे यांनी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर गोरगरीब, बेसहारा लोकांना कशा प्रकारे मदत केली याची सविस्तर माहिती दिली. तसंच चक्री वादळग्रस्तांनाही वंदे मातरम्‌ संघटनेच्या वतीनं कोकणात जाऊन मदत देण्यात आली. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी देश आपल्यासोबत असतो. पण आपण देशासोबत असतो का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सरहद संस्था २०१७ पासून कारगील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन करते. देशातील विविध भागांतील लोकांना कारगीलशी जोडावं यासाठी ही मॅरेथॉन सुरू करण्यात आली. त्यामुळे त्या भागात अलीकडच्या काळात पर्यटन वाढल्याचेही दिसून आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.