Pune:महावितरणला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यास तांत्रिक कर्मचारी सक्षम – प्रादेशिक संचालक अंकुश नाळे 

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या महासंकटात तसेच प्रलयकारी ‘निसर्ग’ व ‘तौक्ते’ चक्रीवादळात  (Pune)महावितरणने अविस्मरणीय ग्राहकसेवेचा प्रत्यय दिला आहे. संकटकाळात देदिप्यमान कामगिरी करणाऱ्या अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे.

 

परंतु, सध्या वीजबिलांचा नियमित भरणा होत नसल्याने थकबाकीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महावितरणची आर्थिक परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. मात्र या आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्याचे सामर्थ्य तांत्रिक कर्मचाऱ्यांमध्ये आहे आणि हे आव्हान स्वीकारून थकीत वीजबिलांच्या वसूलीला वेग द्यावा असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी सोमवारी (दि. 4) केले.

येथील सीओईपी तांत्रिक विद्यापीठाच्या सभागृहात ‘लाइनमन दिना’निमित्त (Pune)आयोजित संवाद कार्यक्रमात प्रादेशिक संचालक श्री. नाळे बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता राजेंद्र पवार, मुख्य महाव्यवस्थापक (प्रशिक्षण व सुरक्षा) दत्तात्रेय बनसोडे, विद्युत निरीक्षक एन. जी. सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता  अरविंद बुलबुले, संजीव राठोड, डॉ. जयवंत श्रीखंडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

 

प्रादेशिक संचालक अंकुश नाळे म्हणाले की, ‘कोरोनाच्या संकटापासून महावितरणची आर्थिक स्थिती चिंताजनक झाली आहे. सध्या थकबाकीमध्ये वाढ होत असल्याने कंपनीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी थकीत वीजबिलांच्या वसूलीशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. जे थकबाकीदार आहेत त्या ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार विनाविलंब खंडित करण्याच्या कार्यवाहीला वेग द्यावा’.

मुख्य अभियंता राजेंद्र पवार म्हणाले, की ‘ग्राहकाकडील विजेच्या एका बटणामागे प्रचंड विस्तारलेल्या वीजयंत्रणेच्या जाळ्यात रात्रंदिवस काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी ‘लाइनमन दिन’ साजरा होत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यामुळे महिला व पुरुष तांत्रिक वीज कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. दर्जेदार व तत्पर ग्राहकसेवेद्वारे महावितरणला राष्ट्रीयस्तरावर नावलौकिक मिळेल अशी कामगिरी करीत राहा’.

New Thergaon Hospital: प्रसूतीकक्ष, प्रसूती शस्त्रक्रिया विभागाला लक्ष्य प्रमाणपत्र

मुख्य महाव्यवस्थापक (प्रशिक्षण व सुरक्षा) श्री. दत्तात्रेय बनसोडे म्हणाले, ‘ग्राहकसेवेसोबतच स्वतःच्या, सहकाऱ्यांच्या व ग्राहकांच्या वीजसुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. ‘शून्य विद्युत अपघात’ या ध्येयाने काम करणे व त्याबाबत ग्राहकांचे सातत्याने प्रबोधन करणे आवश्यक आहे’.

यावेळी विद्युत निरीक्षक एन. जी. सूर्यवंशी यांनी वीजसुरक्षा व डॉ. जयवंत श्रीखंडे यांनी वैद्यकीय प्रथमोपचारासंबंधी माहिती दिली. तसेच मनीषा कसबे, शुभांगी मुचंडे, विवेक पवार, शिवानंद ब्येळ्ळे यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले.

 

या कार्यक्रमात विद्युत सुरक्षेची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी केले. यावेळी सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत (वित्त व लेखा) व ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर तसेच परिमंडलातील अभियंता, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.