Pune : शहरात मे अखेरीस कोरोनाचे आणखी 1500 रुग्ण वाढण्याची भीती ; 5 हजार रुग्ण गृहित धरून महापालिकेचे नियोजन

एमपीसी न्यूज – पुणे शहरात मे अखेरीस कोरोनाचे आणखी 1500 रुग्ण वाढण्याची भीती आहे. एकूण 5 हजार रुग्ण गृहित धरून पुणे महापालिकेने नियोजन केले आहे. तर, पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण 4 हजारांच्या पुढे गेले आहेत. रोज 1500 ते 1600 कोरोनाचा चाचण्या करण्यात येत असल्याने रुग्ण वाढते आहेत.

पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेतर्फे बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे दीड हजार बेड उभारणीसाठी सुरुवात केली आहे. त्यातील 500 बेड तयार आहेत. त्याची पाहणी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच केली.

यापूर्वी कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग हा 8 दिवसांचा होता. तो आता 13 दिवसांवर आला आहे. मे अखेरीस कोरोनाचे 10 हजार रुग्ण होणार असल्याचा अंदाज महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला होता.

मात्र, सध्या या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हा आकडा आता 5 हजारांच्या आसपास जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

बालेवाडीत 3 इमारतीत हे बेड तयार करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात बॅडमिंटन कोर्ट येथील हॉलमध्ये 500 बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. 100 रुग्णांमागे डॉक्टरांसह इतर कर्मचारी असतील.

पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात पुढील 5 वर्षे आरोग्यासाठी जास्त तरतूद करावी लागणार आहे. आरोग्य विभागाची कोणतीही पदे रिक्त राहणार नाहीत, यासाठी काळजी घेण्यात येणार आहे.

कोरोनाच्या संकट काळात भरपूर प्रयत्न केल्यानंतर खाजगी रुग्णालये महापालिके सोबत काम करायला तयार झाली आहेत. आगामी काळात सर्वसामान्य पुणेकरांना थेट मदत करणारी आरोग्य यंत्रणा पुणे महापालिकेला उभारावी लागेल, असा विश्वासही शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला.

तर, पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता 69 कंटेन्मेंट झोनमध्ये बदल करणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.